Saturday, October 24, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRA

शर्मिला आणि राज ठाकरे यांच्या हस्ते  “प्राजक्तराज”चे अनावरण 

आपल्या बहुरंगी अभिनयाने, सूत्रसंचालन, नृत्याने प्रेक्षकांना आपलंस करणाऱ्या प्राजक्ता माळीने अल्पावधीतच आपली एक वेगळी छबी निर्माण केली. ‘प्राजक्तप्रभा’ या काव्यसंग्रहातून आपल्याला प्राजक्तामध्ये दडलेली एक संवेदनशील कवयित्रीही दिसली. आता प्राजक्ता एका नवीन पर्वाला सुरुवात करत असून ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक मराठी साज घेऊन ती आपल्या समोर आली आहे. अस्सल मराठमोळ्या अलंकारांची श्रीमंती, पारंपरिक, घरंदाज आभूषणांच्या या नवीन शृंखलेच्या वेबसाईटचे; महाराष्ट्राचे नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते नुकतेच अनावरण करण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक विश्वास पाटील उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विविध भागातील आभूषणे ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून तीने जगभरातील आभूषणप्रेमींसाठी आणली आहेत.

या वेळी प्राजक्ताला तिच्या नवीन वाटतालीसाठी शुभेच्छा देत  राज ठाकरे म्हणाले, प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ हा स्वतःचा जो ब्रँड उभा केला आहे, त्यासाठी तीचे अभिनंदन. तीने जे दागिने दाखवले त्यांची माहिती मलाही नव्हती. तिची या संकल्पनेमागची भावना, हेतू खरंच कौतुकास्पद आहे. आपल्याला आपल्याच काही गोष्टींचा इतिहास माहीत नसतो. प्राजक्ताप्रमाणेच पुढील पिढीही आपला पारंपरिक, मौल्यवान ठेवा, दागिने त्यांच्या पुढील पिढीला सांगण्यासाठी जोपासतील.‘’

 विश्वास पाटील म्हणाले, ‘’कोणतीही कृती करण्यासाठीचे मूळ हे रक्तातच असावे लागते. प्राजक्ता ही महाराष्ट्रातील मुलगी आहे. त्यामुळे मराठी परंपरा जपण्याचे मूळ हे तिच्या रक्तातच आहे. तिने उचललेले हे पाऊल स्तुत्य आहे. तिच्या नवीन वाटचालीसाठी शुभेच्छा आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात ‘प्राजक्तराज’ पोहोचावा, अशी माझी इच्छा आहे. ‘’

आपल्या या नवीन प्रवासाबद्दल प्राजक्ता माळी म्हणते, ”दागिन्यांचा स्वतःचा ब्रॅण्ड काढेन, हा विचारही कधी मनात नव्हता. भावाच्या लग्नादरम्यान दागिन्यांबाबत काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक जाणवले ते म्हणजे आपले पारंपरिक दागिने लोप पावत आहेत. ध्यानीमनी नसतानाही हा नवीन प्रवास सुरू झाला आणि त्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. अनेक तज्ज्ञांची, जाणकारांची मदत घेतली आहे. महाराष्ट्रातील पारंपरिक दागिन्यांचा अस्सलपणा जपण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. ‘प्राजक्तराज’ हे नावही अतिशय समर्पक आहे. राजेशाही थाटाचा हा नजराणाच आहे. ‘प्राजक्तराज’च्या माध्यमातून तुम्हाला महाराष्ट्रातील अस्सल पारंपरिक दागिने मिळतील. या दागिन्यांवर आधुनिकतेचा साज नसेल आणि हीच ‘प्राजक्तराज’ची खासियत असेल. सध्या ही आभूषणे वेबसाईटवर उपलब्ध असली तरी लवकरच काही प्रदर्शनांमध्येही हे अलंकार विक्रीसाठी उपलब्ध होतील. 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading