रिक्षाचालकांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या रिक्षाचालक आणि वकिलांचा आम आदमी पार्टीतर्फे सत्कार
राजकीय सूडबुद्धीने रिक्षा चालकांवर झालेल्या कारवाईचा निषेध
पुणे: मोटर वाहन कायद्याचा भंग करणारी पुणे शहरातील बेकायदेशीर दुचाकी प्रवासी वाहतूक थांबावी यासाठी कायदेशीर मार्गाने सरकारला अनेक अर्ज विनंती करून देखील सरकारने त्याची कोणतीही दखल न घेतल्याने आंदोलन करणाऱ्या व त्यासाठी कारावास भोगाव्या लागणाऱ्या लढाऊ रिक्षा चालक, आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष आनंद अंकुश आणि आम आदमी पार्टीच्या लिगल सेलचे अॅड गणेश थरकुडे, अॅड हर्षल भोसले, अॅड स्वप्नील गांगुर्डे यांचा सत्कार काल आम आदमी पार्टी तर्फे नाना पेठ येथील पक्ष कार्यालयामध्ये करण्यात आला. यावेळी आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, पुणे शहर समन्वयक डॉ अभिजीत मोरे आणि आप वाहतूक विंगचे राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना आम आदमी पक्षाचे राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार असे म्हणाले की, “मोटर वाहन कायद्याची अंमलबजावणी व्हावी आणि बेकायदेशीर प्रवासी वाहतूक थांबावी ही रिक्षा चालकांची मागणी कायद्याला धरून होती. प्रशासन व राज्य सरकार हे नियमबाह्य वर्तन करत होते. असे असून देखील नियमांचा आग्रह धरणाऱ्या रिक्षाचालकांवर राज्य सरकारने हेतूपुरस्कार खोटी कारवाई केली आणि आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला. सरकारी कामात व्यत्यय, दरोडा यासारखे खोटे गुन्हे दाखल केले. नियमांचा आग्रह धरणाऱ्या रिक्षाचालकांच्या बाजूने आम आदमी रिक्षा चालक संघटना व आम आदमी पार्टी उभी आहे.”
यावेळी बोलताना आम आदमी रिक्षाचालक संघटनेचे अध्यक्ष आनंद अंकुश म्हणाले की, “रिक्षा चालक अनेक समस्यांना तोंड देत व्यवसाय करत असताना बेकायदेशीर प्रवासी वाहतूकीमुळे रिक्षा चालकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झालेला आहे. त्यांना आपले चरितार्थ चालवणे देखील अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत 12 डिसेंबर रोजी झालेले आंदोलन चिरडून टाकण्यासाठी राज्य सरकारने पोलीस यंत्रणेचा वापर केला. आपने लीगल सेलच्या माध्यमातून वकिलांची फौज उभी करून आम्हाला सुखरूप बाहेर काढले. याबद्दल प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक आभार. आम आदमी रिक्षा चालक संघटना रिक्षा चालकांच्या न्याय हक्कासाठी आपला लढा असाच पुढे सुरू ठेवणार आहे.”
बेकायदेशीर बाईक टॅक्सी विरोधात पुणे जिल्हयातील १४ रिक्षा संघटनांनी दि. १२/१२/२०२२ रोजी आंदोलन केले होते. त्यामध्ये ३७ रिक्षा चालक, मालक आणि रिक्षा संघटनांचे पदाधिकारी यांच्यावर राज्य सरकारने हेतुपुरस्सर खोटी गंभीर कलमे ३५३, ३९२, १४३, १४९, ३४२ दाखल करण्यात आली होती. या सर्वांच्या सुटकेसाठी प्रयत्न करणाऱ्या आम आदमी पार्टीच्या लिगल सेलचे अॅड गणेश थरकुडे, अॅड हर्षल भोसले, अॅड स्वप्नील गांगुर्डे यांचा सत्कार काल राज्य संघटक आणि पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार यांच्या हस्ते नाना पेठ येथील पक्ष कार्यालयामध्ये करण्यात आला. याशिवाय या कठीण प्रसंगात मोलाची साथ देणाऱ्या किशोर मुजुमदार, उमेश बागडे, विकास अंकुश, केदार ढमाले, गणेश ढमाले, अनिल धुमाळ, किरण कांबळे, आसिफ मोमीन, सुनिल फतपुरे, किर्तिसिंग चौधरी, गणेश वैराट, अशोक शिंदे, जिब्रिल शेख, मनोज फुलावरे, विशाल गायकवाड, तुषार जगताप, मुंकुंद जाधव, हनुमंत पालवे, अरविंद निकुंभ, शेखर ढगे, अमोल मोरे यांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला.
