भालबा केळकर नाटिका स्पर्धा 14 तर राजा नातू करंडक नाटिका स्पर्धा 17 जानेवारीपासून
पुणे : महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित भालबा केळकर आंतरशालेय नाटिका स्पर्धा दि. 14 व 15 जानेवारी रोजी तर महाराष्ट्रीय कलोपासकने माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी यंदाच्या वर्षीपासून आयोजित केलेली राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धा दि. 17 ते 22 जानेवारी या कालावधीत होत आहे.
दरम्यान आज (दि. 5 जानेवारी) भालबा केळकर आंतरशालेय नाटिका स्पर्धा आणि राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेचे लॉटस् काढण्यात आले. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे 22 आणि 23 प्रवेशिका निश्चित झाल्या आहेत. इंदिरा मोरेश्वर सभागृह, डीएसके चिंतामणी येथे स्पर्धेचे लॉटस् काढण्यात आले. राजा नातू करंडक आंतरशालेय स्पर्धेला पहिल्याच वर्षी शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. संस्थेचे अध्यक्ष अनंत निघोजकर, चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, मिलिंद सबनीस, मंगेश शिंदे, अश्विनी वाघ, अभिजित देशपांडे, अवंती लोहकरे, कनक महाजन आदी उपस्थित होते.
प्राथमिक गटातील नाटिका स्पर्धा ते पुरुषोत्तम करंडक या दोन स्पर्धांमधील दुवा साधला जावा या उद्देशाने महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने यंदाच्या वर्षीपासून माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी नाटिका स्पर्धा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कै. राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिप्रित्यर्थ राजा नातू करंडक अशा नावाने ही स्पर्धा संबोधली जाणार आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक ही संस्था नाट्यसंस्कार कला अकादमीच्या सहकार्याने गेल्या 5 वर्षांपासून प्राथमिक शाळास्तरावर (5 ते 10 वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी) भालबा केळकर करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धांचे आयोजन करीत आहे. मुला-मुलींवर नाट्यविषयक जाणिवांचे संस्कार व्हावेत, सभाधीटपणा, आत्मविश्वास या सारख्या गुणांना उत्तेजन मिळावे हा स्पर्धेचा उद्देश आहे. कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धा होऊ शकल्या नव्हत्या.
भालबा केळकर करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 18 जानेवारी रोजी तर राजा नातू करंडक आंतरशालेय नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ दि. 27 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे.
