महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा आदेश झुगारून बोगस दस्त नोंदणी सुरू
काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी दिली माहिती
पुणे:महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आदेशाचे पालन न करता पुणे शहरात जोमाने बोगस दस्त नोंदणी सुरू असल्याची माहिती प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस महाराष्ट्र राज्य रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.
पुढे बोलताना रोहन सुरवसे पाटील म्हणाले की मार्च 2022 मध्ये पुणे शहरातील बोगस एन ए ऑर्डरचे घोटाळे बाहेर काढले. यामध्ये बोगस एन. ए ऑर्डरची 112 प्रकरणे उघडकीस आली. त्यानंतर 26 गुन्हे हडपसर पोलीस स्टेशन येथे दाखल झाले. त्यानंतर सहा महिने एकही गुन्हा दाखल झाला नाही. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना समक्ष भेटून पुणे शहरात चालणारे बोगस दस्त नोंदणी विषयी माहिती दिली होती. त्यानंतर पुणे येथे महसूल मंत्री विखे पाटील दौऱ्यावर आले असता त्यांनी बोगस एन. ए. ऑर्डरच्या संदर्भात जे जे दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील असे सांगितले.
यासंदर्भात गुन्हे दाखल न झाल्यास आय जी आर, डी आय जी, जे डी आर यांच्या वरती गुन्हे दाखल होतील असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले होते.परंतु तसे झाले नाही.खुद्द महसूल मंत्री यांच्या दिलेला आदेश झुगारून आजही राजरोसपणे हवेली क्रमांक 1 ते 27 मध्ये बोगस एन. ए. ऑर्डर लावून दस्त नोंदणी सुरू आहे. येत्या 15 दिवसात 112 प्रकरणावरती कारवाई करून गुन्हे दाखल करावेत अन्यथा आयजीआर कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे प्रदेश काँग्रेस युवक सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी इशारा दिला आहे.
