पुण्यात प्रथमच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस रुग्ण आढळला
पुणे: पुणे शहरात प्रथमच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ (जेई) अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण आढळून आला आहे.
झालेल्या वडगाव शेरी येथील 4 वर्षांच्या बालकावर 3 नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयात बालरोग विभागात उपचार सुरू आहेत. मंगळवारी त्याचा अहवाल एनआयव्हीमधून आला असून, तो ‘जेई’ पॉझिटिव्ह आहे. त्यानुसार आरोग्य विभागाकडून रुग्णाच्या परिसरातील ताप आणि डासांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.मेंदूज्वराची बाधा झालेला हा शहरातला पहिला रूग्ण आहे. या बालकाला नोव्हेंबरच्या सुरुवातीला ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणे होती. ताप वाढून त्याला तापेचा झटका आला. त्यात त्याचा एक हात आणि पायदेखील कमकुवत झाला.त्याला सुरुवातीला खासगी आणि नंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. त्यानंतर हा बालक दहा दिवस रुग्णालयात उपचार घेत होता. त्यामध्ये थोडी सुधारणा झाली असून सध्या तो ससूनमध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार घेत आहे. गेल्या 2 दिवसांपासून हा रुग्ण ज्या भागात सापडला आहे, तिथं सर्वेक्षण सुरू करण्यात आलं आहे.
रुग्णाच्या घरातील तसेच आजूबाजूच्या घरातील विशेषतः 15 वर्षाखालील मुलांचे रक्त नमुने घ्यायला सुरवात केली आहे. तसेच त्या परिसरात तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज 500 ते 600 लोकांचं सर्वेक्षण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे. . क्युलिस डासामुळे होणारा हा मेंदूज्वर पुण्याच्या आरोग्य यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे. त्यामुळे अशी काही लक्षणं आढळल्यास तात्काळ महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.
