fbpx
Monday, June 17, 2024
ENTERTAINMENTLatest News

विक्रम गोखले अभिनीत ‘सूर लागू दे’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित…

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी मनाला चटका लावणारी एक्झीट घेतली आणि संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. विक्रम गोखले यांनी जरी इहलोकीची यात्रा संपवली असली तरी चित्रपटरूपात ते कायम रसिकांसोबत राहणार आहेत. याच शोकाकूल वातावरणात सिनेरसिकांना दिलासा देणारी बातमी म्हणजे त्यांनी अभिनय केलेला ‘सूर लागू दे’ हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या चित्रपटाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे.

निर्माते अभिषेक ‘किंग’ कुमार आणि नितीन उपाध्याय यांनी आॅडबॅाल मोशन पिक्चर्सच्या बॅनरखाली ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. प्रवीण विजया एकनाथ बिरजे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. पिकल एंटरटेन्मेंटचे समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी या चित्रपटाच्या वितरणाचं काम पाहत आहेत. ‘सूर लागू दे’ या चित्रपटाच्या शीर्षकातच संगीताचा ताल दडलेला आहे. त्यानुसार या चित्रपटाचं कथानकही काहीशा वेगळ्या पठडीतील आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळये हे दोन दिग्गज कलाकार ‘सूर लागू दे’मध्ये मुख्य भूमिकेत आहेत. या निमित्तानं विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळ्ये बऱ्याच दिवसांनी एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटात सुप्रसिद्ध मराठी टीव्ही अभिनेत्री रीना अगरवालही महत्त्वपूर्ण भूमिकेत असून इतरही मातब्बर कलावंतांची फळी यात असल्यानं अभिनयाची जणू जुगलबंदीच रंगलेली पहायला मिळणार आहे. विक्रम गोखले यांनी नेहमी संवेदनशील, सामाजिक आशयावर आधारलेले, वर्तमान काळाशी निगडित असलेलल्या आणि नाविन्यपूर्ण विषयावर आधारलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. ‘सूर लागू दे’ हा चित्रपट त्यांची परंपरा पुढे सुरू ठेवणारा असून त्यांच्या पश्चातही त्यांचं काम आणखी प्राभावीपणे सादर करणारा ठरेल. या चित्रपटाची कथा अशा लोकांवर आधारलेली आहे ज्यांच्यासाठी विक्रम गोखले कायम उभे राहिले.

मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधनाचा वारसा जपत ‘सूर लागू दे’ फुल टू मनोरंजन करणार आहे. याबाबत दिग्दर्शक प्रवीण म्हणाले की, ‘सूर लागू दे’ या चित्रपटाची कथा कुठेही घडू शकणारी आहे. आयुष्याच्या संध्याकाळी एक व्यक्ती कशाप्रकारे संघर्ष करत इतरांसाठी प्रेरणादायी कार्य करतो ते यात पहायला मिळेल. ‘सूर लागू दे’ या चित्रपटाचं लेखन आशिष देव यांनी केलं असून, संगीत पंकज पडघन यांनी दिलं आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading