Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

घोरात्कष्टात स्तोत्रपठणातून शेकडो भक्तांचा दत्तचरणी मंत्रघोष

पुणे : श्रीपाद वल्लभ दिगंबरा….च्या जयघोषाने आणि नर्मदे हर हर… च्या निनादात सामाजिक पर्यावरण शुद्धीचा सिद्ध वेदघोष असलेल्या प.पू.वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित घोरात्कष्टात स्तोत्राचे सामुदायिक पठण पुणे व जिल्ह्यातील शेकडो दत्तभक्तांनी एकत्रितपणे केले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त… च्या नामघोषाने लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिराचा परिसर दुमदुमून गेला. त्याचवेळी दत्तचरणी हजारो भाविक मनोभावे नतमस्तक होत होता.

श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्ट आणि अखिल भारतीय त्रिपदी परिवार तर्फे या कार्यक्रमाचे आयोजन बुधवार पेठेतील दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात दत्तजयंती उत्सवाचे शुभारंभानिमित्ताने करण्यात आले होते. मंदिराचे यंदा १२५ वे स्थापना वर्ष आहे. यावेळी अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे प्रमुख प.पू.बाबा महाराज तराणेकर (इंदोर), जगत् गुरू श्री तुकारम महाराज संस्थान देहूचे विश्वस्त ह भ प शिवाजी महाराज मोरे तसेच दत्तमंदिर ट्रस्टचे कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे, उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त डॉ. पराग काळकर, राजू बलकवडे, अक्षय हलवाई यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. घोरात्कष्टात मंत्र पठणातून लोकमंगल व्हावे, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.

प.पू.बाबा महाराज तराणेकर म्हणाले, दत्त संप्रदायाची मंदिरे देशभरात आहेत. परंतु श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर हे एकमेव मंदिर आहे जिथे दत्त जयंतीची सुरुवात  लोकमंगलवर्धक घोरात्कष्टातच्या सहस्त्र आवर्तनाने होते. घोरात्कष्टातचे स्तोत्रपठण हे केवळ आपल्यासाठी नाही, तर आपल्या आजूबाजूच्या परिसराच्या शुद्धीकरणासाठीची ही दैवी चिकित्सा आहे. घोरात्कष्टात स्तोत्र हे स्वांत:सुखाय नाही, पर्यावरण शुद्धीकारक अशी ही थेरपी आहे.
एखादी संस्था १२५ व्या वर्षात पदार्पण करते हे त्या संस्थेचे वैशिष्ट्य आहे. त्या संस्थेचे महात्म्य यशस्वीपणे टिकून ठेवणे हे देखील महत्त्वाचे आहे, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.

कार्यकारी विश्वस्त ॲड. शिवराज कदम जहागिरदार म्हणाले, घोरात्कष्टात हे लोकमंगल वर्धक स्तोत्र अत्यंत लोकप्रिय असून अनेक दत्तभक्तांच्या नित्य उपासनेत याचा अंतर्भाव असतो. दत्त जयंतीच्या निमित्ताने सर्व देवता उपासक एकत्र यावे आणि सामुहिक उपासना व्हावी, याकरीता स्तोत्र पठण करण्यात आले. त्रिपदी परिवार पुणे शाखेचे तेजसदादा तराणेकर, हरी मुस्तीकर, सुभाष कुलकर्णी, श्रीरंग लोंढे यांनी आयोजनात सहकार्य केले. उत्सवप्रमुख अ‍ॅड.रजनी उकरंडे यांनी आभारप्रदर्शन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading