Thursday, August 27, 2026
Latest NewsPUNE

दमदार कलाविष्काराने १० व्या तालचक्र महोत्सवाची सांगता

पुणे : पारंपरिक लोकसंगीताचे बहारदार सादरीकरण, दमदार ढोलवादन आणि विविध तालवाद्यांच्या निनादात रसिक श्रोते रविवारी मंत्रमुग्ध झाले. तबला आणि कथक नृत्यच्या माध्यमातून झालेला सवाल-जवाब प्रेक्षकांकडून मिळालेला टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद अशा उत्साही वातावरणात १०व्या तालचक्र महोत्सवाची दिमाखात सांगता झाली.

प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे व पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तालचक्र संगीत महोत्सवाची सांगता रविवारी,२० नोव्हेंबर रोजी कोथरूड येथील महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झाली. महोत्सवाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे सुपुत्र व प्रसिद्ध ढोलकी वादक विजय चव्हाण यांचा महाराष्ट्रातील विविध पारंपारिक ताल वाद्यांवर आधारित ‘फोक ड्रम्स ऑफ महाराष्ट्र’ हा विशेष कार्यक्रम,जागतिक किर्तीचे कलाकार सिवामणी, सुप्रसिद्ध तबला वादक पद्मश्री पं.विजय घाटे आणि कथक नृत्यांगना शीतल कोलवलकर यांचा कथक नृत्याविष्कार सादर झाला.

याप्रसंगी पुनीत बालन ग्रुप’ चे पुनीत बालन, बढेकर ग्रुप’ चे प्रवीण बढेकर, अर्लीकॉन बाल्झर्स’ चे दक्षिण पूर्व आशियाचे विभागीय संचालक प्रवीण शिरसे, लोकमान्य मल्टीपर्पज को – ऑपरेटिव्ह लिमिटेड’चे पुणे विभागप्रमुख सुशील जाधव, कोहिनूर ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक कृष्णकुमार गोयल, व्हायोलिन अकॅडमी’चे संस्थापक पं.अतुलकुमार उपाध्ये आणि राजस व तेजस उपाध्ये यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

पहिल्या सत्रात विजय चव्हाण आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी महाराष्ट्रातील पारंपारिक तालवाद्यांचे वादन सादर केले. हलगी आणि ढोलकी च्या माध्यमातून ‘मोहरा’ आणि ‘ गण ‘ सादरीकरणाने त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरवात केली. त्यानंतर लोकसंगीतील जागरण, गोंधळ या रचना सादर केल्या. गिरगाव ढोलताशा पथकाचे बहारदार तबलावादन आणि तालवाद्यांच्या जुगलबंदीला रसिकांनी टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद दिला. सुभाष खरोटे, विकास कोकाटे, गणेश सावंत, अभिजित जाधव, योगेश चिकटगावकर या कलाकारांनी हे सादरीकरण केले. ढोल – ताशा आणि तुतारीच्या निनादात ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ने या सत्राचा समारोप झाला.

शेवटच्या सत्रात पद्मश्री पं. विजय घाटे, आणि नृत्यांगना शीतल कोलवलकर यांनी ‘मेलोडिक रिदम ‘ या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम सादर केला. गणेशवंदना, कृष्ण वंदनेदवारे त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरवात केली. त्यानंतर भजन, श्लोक, तबला सोलो आणि कथकमधून सवाल- जवाब सादर करण्यात आले. सिवामणी यांनी आपल्या अनोखया शैलीने १०० हून अधिक तालवाद्यांचे वादन करून, कार्यक्रमात आणखी रंगत भरली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading