Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

तालचक्र महोत्सवात रसिकांनी अनुभवली डान्स बॅले आणि फ्युझन संगीताची पर्वणी

पुणे :  फ्युझन वाद्यवृंदाचे मंत्रमुग्ध करणारे ताल-सूर…दमदार डान्स बॅले आणि त्यामुळे रंगत गेलेली सुरेल सायंकाळ….अशी अनोखी सांस्कृतिक पर्वणी पुणेकर रसिकांनी शनिवारी अनुभवली. निमित्त होते १० व्या तालचक्र संगीत महोत्सवाचे.

प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री विजय घाटे व पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन शनिवारी, १९ नोव्हेंबर रोजी कोथरूड येथील महालक्ष्मी लॉन्स येथे संपन्न झाले. याप्रसंगी पुनीत बालन ग्रुप ‘चे पुनीत बालन, लोकमान्य मल्टीपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड’च्या श्वेता रानडे,बढेकर ग्रुप’चे प्रवीण बढेकर,  तबलावादक पं.विजय घाटे, व्हायोलिन अकॅडमी’चे संस्थापक आणि व्हायोलिन वादक पं.अतुलकुमार उपाध्ये,व्हायोलिन वादक राजस आणि तेजस उपाध्ये उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुुरवातीस प्रसिद्ध बासरीवादक राकेश चौरासिया आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘फ्युझन २०२२ राकेश अँड फ्रेंड्स’ हा विशेष कार्यक्रम सादर झाला. चौरसिया यांच्या वाद्यवृंदात प्रसिद्ध ड्रमर जीनो बँक्स, तबला वादक ओजस अधिया, बेस गिटार वादक शेल्डन डिसिल्वा, कीबोर्ड वादक आणि गायक संगीत हळदीपूर, गिटार वादक संजोय दास आणि मृदंगवादक श्रीधर पार्थसारथी यांचा समावेश होता. या वाद्यवृंदाने आपल्या सादरीकरणाची सुरवात किरवानी रागातील ‘वेटींग फॉर द वन’ या रचनेद्वारे केली. त्यांनंतर राग जोगमधील ‘रन अवे’, किरवणी रागातील ‘नाईट इन हवाना’, मारवा, फिरतोडी, मधुबनी रागातील मिश्र रचना आणि पहाडी धूनमधील ‘डान्स विथ मी’ रचना तसेच जीनो बँक्स आणि श्रीधर पार्थसारथी यांचे सोलो सादरीकरण झाले. शास्त्रीय रागात फ्युजन रचना हे या सादरीकरणाचे वैशिष्ट्य होते. पुण्यात बऱ्याच वर्षांनी सादर झालेल्या या वैशिट्यपूर्ण कार्यक्रमाला रसिकांनी मनमुराद दाद दिली.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात संगीत मार्तंड पं. जसराज यांच्या अभिजात रचनांवर आधारित आणि प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना गुरू शमा भाटे यांची संकल्पना असलेला ‘आवत मोहन’ हा डान्स बॅले सादर झाला. नृत्यांगना गुरू शमा भाटे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी कृष्णाचे लालित्य दर्शविणाऱ्या बंदिशी नृत्य आणि संगीताच्या माध्यमातून प्रस्तुत केल्या. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरवात ‘ आवत मोहन धेनू चराए’ या बंदिशीद्वारे केली. त्यानंतर ‘चितवन रोके हू न रही’ बंदिश, ‘ इतलारे धीम’ हा तराणा आणि राधेचे वर्णन करणारी ‘मृगनयनी को प्राण नवल रसिया मृगनयनी’ ही बंदिश सादर केली. नीरजा आपे यांनी कार्यक्रमाचे निवेदन केले. या मनमोहक नृत्य प्रस्तुतीला रसिकांनी टाळ्यांचा उस्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading