Sunday, June 14, 2026
Latest NewsSports

सोलारीस करंडक वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन !!

 

* स्पर्धेत २०० खेळाडूंचा सहभाग; एकूण सव्वा सहा लाख रूपयांची पारितोषिके !!

पुणे, दि. १५ नोव्हेंबरः पुण्यामध्ये सलग चौथ्या वर्षी सोलारीस करंडक वरिष्ठ पुरूष राष्ट्रीय टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा सोलारीस क्लब, मयुर कॉलनी येथे दि. १९ ते २४ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे. आपापल्या काळातील राष्ट्रीय विजेते आणि देशातील विविध राज्यांमध्ये प्रशिक्षक असणार्‍या दिग्गज् वरिष्ठ खेळाडू स्पर्धेमध्ये सहभागी झाले आहेत.

तब्बल सव्वा सहा लाख रूपये पारितोषिक रक्कम असलेल्या या स्पर्धेचे आयोजन सोलारीस क्लब तर्फे करण्यात आले आहे. रविंद्र पांड्ये टेनिस अ‍ॅकॅडमी (आरपीटीए) यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेला बधेकर ग्रुप यांनी प्रायोजित केले असून स्पर्धेत सुमारे २०० खेळाडू सहभागी होणार आहे.

स्पर्धेबाबत अधिक माहिती सांगताना सोलारीचे संचालक जयंत पवार आणि सोलारीस क्लबचे सीईओ हृषीकेश भानुशाली म्हणाले की, ज्या खेळाडूंनी आपल्या कारकिर्दीमध्ये अनेक राष्ट्रीय विजेतेपदके पटकावली असून आपल्या काळातील ते सर्वोत्तम खेळाडू होते, अशा अनेक वरिष्ठ आणि माजी खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग निश्‍चित केला आहे. ग्लोबल वरिष्ठ टेनिस संघटनेच्या (जीएसटीए) वतीने सलग चौथ्या वर्षी या स्पर्धा पुण्यात भरवण्यात येत असून पुण्यामध्ये सोलारीस क्लबला या स्पर्धेचा आयोजनाचा मान सलग चौथ्या वर्षी मिळाला आहे. स्पर्धेला बधेकर ग्रुपचे प्रविण बधेकर यांनी आर्थिक पाठींबा दिला असून डीएनए यांनीही पाठींबा दिला आहे.

ही स्पर्धा ३५ वर्षावरील, ४५ वर्षावरील, ५५ वर्षावरील, ६५ वर्षावरील आणि ७५ वर्षावरील अशा पाच गटात होणार आहे. ही स्पर्धा एकेरी आणि दुहेरीमध्ये होणार आहे. जीएसटीए या संघटनेच्या मान्यतेखाली स्पर्धेचे आयोजन होत असून वरिष्ठ खेळाडूंकडून अनेक गोष्टी शिकण्याची संधी पुण्यातील युवा खेळाडूंना मिळणार आहे.

स्पर्धेमध्ये सुमारे २०० खेळाडू सहभागी होतील, असा विश्‍वास हृषीकेश भानुशाली यांनी व्यक्त केला. स्पर्धेत महाराष्ट्रासह, विशाखापट्टणम, तामिळनाडू, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक, ओरिसा, दिल्ली, मध्यप्रदेश व गोवा या राज्यातील खेळाडू सहभागी होणार आहेत. सोलारीस क्लब तर्फे सर्व खेळाडूंचे आदरतिथ्य मोफत करण्यात येणार असून त्यांना जेवण, नाश्ता यासह व्यायामशाळा आणि क्लबमधील इतर सवलतींचाही पुरेपुर लाभ घेता येणार आहे.

स्पर्धेतील विजेत्यांना गुणांसह करंडक आणि रोख पारितोषिके मिळणार आहेत. एकेरी गटाच्या विजेत्या खेळाडूला १२० गुण, उपविजेत्या ८५ गुण, उपांत्य फेरीतील खेळाडूंना ५५, उपांत्यपुर्व ३५ गुण, उप-उपांत्यपुर्व फेरीतील २० गुण मिळणार आहेत. पहिल्या फेरीतील खेळाडूंना १० गुण मिळणार आहेत. तसेच दुहेरी गटामध्ये विजेत्या जोडीला ८५ गुण, उपविजेत्या जोडीला ५५ गुण, उपांत्य फेरीतील जोडीला ३५ गुण, उपांत्यपुर्व २० गुण आणि उप-उपांत्यपुर्व जोडीला १० गुण मिळणार आहेत.

गतवर्षी स्पर्धेच्या एकेरी गटात पुण्याच्या केतन धुमाळ (३५ वर्षावरील गट), नितीन किर्तने (४५ वर्षावरील गट), अजय कामत (५५ वर्षावरील), एम. सुरेश (६५ वर्षावरील गट) आणि श्रीकांत पारेख (७५ वर्षावरील गट) यांनी विजेतेपद मिळवले होते.

स्पर्धेची नावनोंदणी (साईनिंग) एकेरीसाठी १८ नोव्हेंबर रोजी (सकाळी १० ते दुपारी २) व दुहेरीसाठी १९ नोव्हेंबर रोजी (सकाळी १० ते दुपारी २) होणार आहे.

स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी आणि नावनोंदणीसाठी संपर्कः राजेश सपकाळ, क्लब समन्वयक, ८३०८८३८०११.

——

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading