मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी
ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील वागळे इस्टेटमधील किसननगर भागात राडा झाला. शिंदे आणि ठाकरे गटात हाणामारी झाली. हाणामारीत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते जखमी झाले. ठाण्यातील राड्याप्रकरणी रात्री उशीरा श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
किसनगर येथील भटवाडी परिसरात ठाकरे गटाच्या संजय घाडीगावकर यांनी एक बैठक बोलावली होती. बैठकीला ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख केदार दिघे उपस्थित होते. बैठक ज्या ठिकाणी सुरू होती त्याच भागाजवळ शिंदे गटाचे कार्यकर्ते एका कार्यक्रमासाठी जमले होते. एका क्षणी दोन्ही गटांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर आले आणि जोरदार घोषणाबाजी सुरू झाली. घोषणाबाजीची तीव्रता वाढली. काही कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावले आणि हाणामारी झाली. हाणामारीत ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते जखमी झाले. राड्याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.
