प्रेरणा संगीत संस्थेतर्फे दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : जयपूर अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांच्या प्रेरणा संगीत संस्थेतर्फे दोन दिवसीय सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम २१ व २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता नवी पेठेतील गांजवे चौक येथील श्रमिक पत्रकार भवनाच्या कमिन्स सभागृह येथे होणार आहे. कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.
कार्यक्रमात पहिल्या दिवशी म्हणजेच २१ नोव्हेंबर रोजी सानिया पाटणकर यांच्या शिष्यांचे गायन होणार आहे. त्यांना कार्तिकस्वामी, ओमकार बोर्डे, श्रीकांत पोवळे आणि तुषार जोशी हे साथसंगत करतील.
दुसऱ्या दिवशी म्हणजे २२ नोव्हेंबर रोजी आयोजित ‘घराणा संमेलन’या कार्यक्रमात पंडित आनंद भाटे यांचे शिष्य आणि किराणा घराण्यातील गायक आशिष रानडे, पं. सज्जनलाल भट, गानसम्राज्ञी किशोरी अमोणकर आणि पं. रघुनंदन पणशीकर यांच्या शिष्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका विदुषी ज्योती अय्यर आणि डॉ. आश्विनी भिडे यांच्या शिष्या व जयपूर -अत्रौली घराण्याच्या गायिका विदुषी सानिया पाटणकर यांचे गायन होणार आहे. कार्यक्रमात गायिका आरती अंकलीकर – टिकेकर यांच्या शिष्या कस्तुरी पायगुडे-राणे या भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर आधारित पुस्तकावर विवेचन करतील. पंडित बाळकृष्ण अय्यर,चारुदत्त फडके, मिथिलेश कुमार झा आणि माधव लिमये हे प्रमुख कलाकारांना साथसंगत करतील.
