Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

महाराष्ट्र साहित्य परिषद आयोजित दिवाळी अंक स्पर्धा-२०२२

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गेली ५० वर्षे दिवाळी अंक स्पर्धा घेतली जाते. दर्जेदार दिवाळी अंकांना उत्तेजन मिळावे, नव्या  दमाच्या आणि ताकदीने लेखन करणाऱ्या लेखकांना प्रोत्साहन मिळावे हा उद्देश ही स्पर्धा आयोजित करण्यामागे आहे. म.सा.परिषदेकडे स्पर्धेसाठी आलेल्या दिवाळी अंकांतूनच ही निवड केली जाते. यामध्ये ४ सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकांना अ. स. गोखले स्मृत्यर्थ्य ‘रत्नाकर पारितोषिक’, चंद्रकांत शेवाळे  पुरस्कृत ‘विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक’, ‘मासिक मनोरंजनकार का.र.मित्र पारितोषिक’ आणि ‘शं.वा. किर्लोस्कर पारितोषिक’ तसेच, दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठी ‘दि.अ. सोनटक्के पारितोषिक’, उत्कृष्ट बालकुमारवाड्मय असलेल्या दिवाळी अंकास ‘जानकीबाई केळकर पारितोषिक’, ‘डेलिहंट पुरस्कृत ऑनलाईन दिवाळी अंक पारितोषिक’ समारंभपूर्वक प्रदान केले जाते. या स्पर्धेला दिवसेंदिवस उत्तम प्रतिसाद मिळत असून गेल्या वर्षी तब्बल साडेतीनशेहून अधिक दिवाळी अंकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. यावर्षीही जास्तीत जास्त दिवाळी अंकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी आपल्या दिवाळी अंकाच्या २ प्रती कार्यवाह, ग्रंथालय विभाग, महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ३० या पत्त्यावर दि. २५ नोव्हेंबर  २०२२ पर्यंत प्रत्यक्ष आणून द्याव्यात  किंवा पोस्टाने / कुरिअरने पाठवाव्यात असे प्रा. जोशी यांनी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading