‘हर हर महादेव’ चित्रपटाचे शो मनसैनिकांच्या बंदोबस्तात सुरू
पुणे : ‘हर हर महादेव’ या चित्रपटावरील वाद आता शिगेला पोहचला आहे. या चित्रपटावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेस यांच्यात वाद रंगला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत आहे. पुण्यातील कोथरुडमधील सिटीप्राईड थिएटरमध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी शहरातील बंद करण्यात आलेले ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचे शो मनसेच्या कार्यकर्त्यांनी पुन्हा सुरू करायला लावले.
मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर, राज्य सरचिटणीस अजय शिंदे, बाबू वागसकर हे आज दुपारच्या सुमारास कोथरूड येथील सिटी प्राईडमध्ये कार्यकर्त्यांसह दाखल झाले. त्यांच्या उपस्थितीमध्ये ‘हर हर महादेव’ या चित्रपटाचा शो प्रेक्षकांसाठी सुरु करण्यात आला.
शहरातील प्रत्येक सिनेमागृहात ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो सुरू राहणार असून, प्रेक्षकांनी येऊन हा चित्रपट पहावा. हा चित्रपट पहात असताना प्रेक्षकांना मनसेकडून संरक्षण कवच देण्यात येणार आहे. केवळ राज ठाकरे यांचा आवाज असल्याने या चित्रपटाला विरोध केला जात आहे. पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर,राज्य सरचिटणीस अजय शिंदे, बाबू वागसकर या नेत्यांनी प्रेक्षकांनी चित्रपटगृहात येऊन ‘हर हर महादेव’ चित्रपट पहावा असे आवाहन केले आहे.
