अरुण दाते यांच्या लोकप्रिय गाण्यांवर आधारित ‘नवा शुक्रतारा’ कार्यक्रमाचे आयोजन
‘शुक्रतारा मंदवारा’ या अजरामर गीताच्या हिरक महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत रसिकांना मिळणार तरल भावगीतांची मेजवानी
पुणे : ‘शुक्रतारा मंदवारा’ या अत्यंत लोकप्रिय अशा गाण्याच्या हिरक महोत्सवही वर्षाचे औचित्य साधत अतुल अरुण दाते आणि ड्रीम्स रीडेव्हलप्ड यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यात ‘नवा शुक्रतारा’ या अरुण दाते यांच्या लोकप्रिय गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रम गुरुवार, दिनांक १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५:३० वाजता कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे संपन्न होईल. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्वावर तो दिला जाईल. ‘नवा शुक्रतारा’ या कार्यक्रमाचा हा ६८ वा प्रयोग असून यात मंदार आपटे, पल्लवी पारगावकर, वर्षा जोशी आणि स्वतः अतुल अरुण दाते सहभागी होणार आहेत. कार्यक्रमात अरुण दाते यांच्या लोकप्रिय गाण्यांबरोबरच दृकश्राव्य माध्यमातून अरुण दाते यांच्याशी संबंधित काही विशेष आठवणी देखील जागवल्या जातील.
भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी या गाण्याल्या ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित जागतिक भावगीत स्पर्धेच्या वर्षा जोशी या विजेत्या आहेत तर मंदार आपटे हे प्रसिद्ध गायक व संगीतकार आहेत. ती सध्या काय करते या लोकप्रिय चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन आपटे यांनी केले आहे. पल्लवी पारगावकर या वकील व प्रसिध्द गायिका आहेत. कार्यक्रमाची संकल्पना अतुल अरुण दाते यांची असून ते स्वतः सूत्रसंचालनाची जवाबदारी पार पाडतील.
