Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

आंतरराष्ट्रीय कांस्यपदक विजेत्या येरवडा कारागृहातील बुद्धिबळ संघाचा इंडियन ऑईलच्या अध्यक्षांच्या हस्ते सत्कार

पुणे : जागतिक बुद्धिबळ महासंघाने (फिडे) नुकत्याच आयोजित केलेल्या कारागृहातील कैद्यासाठीच्या आंतरखंडीय स्वातंत्र्यासाठी बुद्धिबळ ऑनलाईन अजिंक्यपद स्पर्धेत भारतासाठी कांस्यपदक जिंकणाऱ्या पुण्याच्या येरवडा कारागृहातील सहा बंद्यांचा इंडियन ऑईलचे अध्यक्ष श्री. एस. एम. वैद्य यांनी सत्कार केला. या स्पर्धेत भारतीय कारागृहांतील कैद्यांनी सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यांनी ४६ देशांतील ८५ संघांचा सामना केला. या सहभागी झालेल्या संघाची तयारी आणि प्रशिक्षण हे श्री. वैद्य यांचीच कल्पना असलेल्या इंडियन ऑईलच्या परिवर्तन – प्रिझन टू प्राईड या अभियानातून झाली. या उपक्रमांतर्गत, कैद्यांच्या शारीरिक व मानसिक कल्याणासाठी सर्व कारागृहातील बुद्धिबळ, बास्केटबॉल, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल आणि कॅरम अशा विविध खेळांच्या प्रशिक्षणाला इंडियन ऑईल मदत पुरवते. यावेळी वैद्य यांनी इंडियन ऑईलच्या मार्गदर्शनाखाली कैद्यांना प्रशिक्षण देणारे  केतन खैरे यांचाही सत्कार केला. या अनोख्या उपक्रमाला सहकार्य पुरवणारे येरवडा कारागृहाचे अधीक्षक शिवशंकर पाटील आणि अन्य वरिष्ठ तुरुंगाधिकाऱ्यांचाही वैद्य यांनी सत्कार केले.

यावेळी बोलताना इंडियन ऑईलचे अध्यक्ष एस. एम. वैद्य म्हणाले, “येरवडा कारागृहातील प्रतिभावान बुद्धिबळ संघाच्या या यशामुळे, कठीणातील कठीण आव्हानांमध्येही आशा आणि उमेद निर्माण करण्याच्या खेळांच्या जादुई शक्तींमध्ये आमचा विश्वास अजून वाढला आहे. परिवर्तन प्रिझन टू प्राईड पुढे घेऊन जाण्यासाठी आणि आपल्या कारागृहांमध्ये खेळांचा प्रसार करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.” या कैद्यांच्या मानसिक खंबीरतेचे कौतुक करत वैद्य म्हणाले, “खेळ जिंकण्यासाठी आपल्याला नेहमी केवळ आगेकूच करण्याची गरज नसते. बुद्धिबळाप्रमाणेच जीवनातही कधी कधी आपल्याला उत्तम भविष्याकडे जाण्यासाठी एखादे पाऊल मागे यावे लागते.”

इंडियन ऑईलने अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघासोबत या आंतरखंडीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी पहिल्यावहिल्या परिवर्तन – प्रिझन टू प्राईड या ऑनलाईन स्पर्धेतून भारतीय संघांची निवड केली होती. यात २० भारतीय कैद्यांनी भाग घेतला होता. पुणे व प्रयागराज कारागृहांतील संघांनी या अजिंक्यपद स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित केली होती, तर तिहार कारागृहातील महिला व किशोर संघांनी त्यांच्या वर्गात पात्रता मिळविली होती.

१५ ऑगस्ट २०२१ रोजी आरंभ झाल्यापासून इंडियन ऑईलने २० राज्ये आणि ५ केंद्रशासित प्रदेशांतील ३७ कारागृहांतील १७५० पेक्षा अधिक कैद्यांना तीन टप्प्यांमध्ये प्रशिक्षण दिले आहे. या उपक्रमातून सहभागी कैद्यांना उपकरणे आणि किट्स यांच्यासह प्रशिक्षण सुविधा पुरविण्यात येत आहेत. इंडियन ऑईलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू या योजनेवर देखरेख करत आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading