पेनप्रेमींतर्फे पुण्यात फाउंटन पेन दिवस उत्साहात साजरा
पुणे : आजच्या डिजिटल जगात जेव्हा चांगले हस्ताक्षर दुर्मिळ होत चालले आहे, तेव्हा फाउंटन पेन ते पुन्हा मिळवण्यात मदत करू शकतात. या पेनाद्वरे लेखन करताना,जेव्हा तुमचे डोळे, मन आणि हात एकरूप होतात, तेव्हा एक सुंदर कलाकृती घडवतात. लेखनाच्या संथगतीमुळे हे घडते. त्यामुळेच फाउंटन पेनमुळे चांगले हस्ताक्षर परत मिळण्यास मदत होऊ शकते,”असे मत महाराष्ट्राचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी विश्वास व्यक्त केले.
नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी आंतरराष्ट्रीय फाऊंटन पेन दिवस साजरा केला जातो. या निमित्त पुण्यातील फाऊंटन पेन प्रेमींतर्फे डेक्कन जिमखाना क्लब येथे आयोजित कार्यक्रमात मांढरे बोलत होते. यावेळी व्हीनस ट्रेडर्स आणि रायटिंग वंडर्स’ चे सुरेंद्र करमचंदानी, वास्तुविशारद यशवंत पिटकर, सिंबायोसिस महाविद्यालयाच्या डिजाइन विभागाचे प्रमुख मनोहर देसाई, मॅग्ना कार्ता पेन्स’ चे भारत कांखरा आणि हार्दिक कांखरा आणि चिंटूकार चारुहास पंडित हे उपस्थित होते.
या प्रसंगी देसाई यांनी संकलित केलेल्या दुर्मिळ स्वरूपातील ऐतिहासिक लेखन साहित्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते. यामध्ये पितळ आणि तांब्यापासून बनवलेली हत्ती आणि ससे यांसारख्या प्राण्यांचा प्रतिकृतीचा समावेश असलेली विविध आकारातील जुनी शाईची भांडी, ताम्रपट, हस्तलिखिते, बोरू, जुने पेन, मोरपीस, शाई शोषून घेण्याचे उपकरण अशा विविध लेखन साहित्यांचा समावेश होता. यातील काही वस्तू या 200 वर्षांपेक्षा जुन्या असून, त्या राजस्थान, दिल्ली आणि उत्तर प्रदेश या राज्यांमधून संकलित करण्यात आल्या आहेत.
कार्यक्रमात करमचंदानी यांनी पू.ल. देशपांडे सिग्नेचर फाऊंटन पेन आणि चिंटू फाऊंटन पेनच्या यशानंतर माजी राष्ट्रपती डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांना आदरांजली अर्पण करण्याच्या दृष्टीने लवकरच एपीजे अब्दुल कलाम सिग्नेचर पेन आणणार असल्याचे तसेच १० आणि ११ डिसेंबर रोजी सेनापती बापट रस्ता येथील हॉटेल जे डब्ल्यू मेरिएट येथे आंतराष्ट्रीय पेन फेस्टीव्हल आयोजित करणार असल्याचे जाहीर केले.
