पुण्यातील आर्किटेक्चर’च्या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी
पुणे : ‘द ड्रॉइंग बोर्ड’ या आंतरराष्ट्रीय डिझाइन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारत, पुण्यातील आर्किटेक्चर अभ्यासक्रमाच्या पाच विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरीची नोंद केली आहे. जगभरातील डिझाइन आणि आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन जागतिक पातळीवर करता यावे, यासाठी गेली सात वर्षे या स्पर्धेचे आयोजन केले जाते. बेंगळूरू येथील माइंडस्पेस आर्किटेक्ट्स आणि पुण्यातील रोहन बिल्डर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ही स्पर्धा नुकतीच संपन्न झाली.
स्पर्धेत यंदा भारतासहित सुमारे २५ देशांमधील तब्बल २८०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. दोन टप्प्यात घेण्यात आलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांना त्यांचे डिझाइनबाबत ऑनलाइन सादरीकरण करण्यास सांगितले गेले. त्यातून परीक्षकांनी निवडलेल्या आठ सर्वोत्कृष्ट डिझाईन’चे दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात वास्तुविशारद क्षेत्रातील परीक्षकांसमोर व्यक्तिशः सादरीकरण करण्यात आले.
यामध्ये पुण्यातील डी वाय पाटील स्कूल ऑफ आर्किटेक्चरचे प्रथमेश पवार, अर्जुन बोरकर आणि अनिकेत तांबे यांनी तर एसएमईएफएस ब्रिक्स स्कूल ऑफ आर्किटेक्चर’च्या अमेय राठी आणि तानिया जोस यांनी अंतिम फेरीत स्थान मिळवत, या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपल्या कौशल्याची चुणूक दाखविली. पुण्यातील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त नागपूर येथील प्रियदर्शिनी इन्स्टिट्यूट ऑफ आर्किटेक्चर अँड डिझायनिंग स्टडीज’चे निकुंज अग्रवाल आणि कौस्तुभ कडगळे तसेच नाशिक येथील एमव्हीपी कॅन्स’चे शिरीन सय्यद आणि संयुक्ता वागुल्डे या विद्यार्थ्यांनीदेखील स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभाग नोंदवला होता.
स्पर्धेत देहराडून येथील स्कूल आर्किटेक्चर अँड प्लानिंग’चे विद्यार्थी ऑफ केतन गुप्ता आणि वैभवी धीमान यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर विजयवाडा येथील एसपीए’चे विद्यार्थी निमित भन्साळी आणि रुत्विक कोकडवार यांनी द्वितीय क्रमांक आणि ‘व्ह्यूअर्स चॉईस’ पुरस्कार मिळविला. पोलंड येथील युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी’च्या मिचल रिपलविझ आणि सेबॅस्टियन स्क्रझिप्कोव्स्की तसेच म्हैसूर येथील वाडियार सेंटर फॉर आर्किटेक्चर’ चे विद्यार्थी कशिशी सिंग आणि शुभाशी आनंद यांना विभागून तृतीय पारितोषिक देण्यात आले.
दरवर्षी आयोजित होणाऱ्या या स्पर्धेसाठी यंदा ख्यातनाम भारतीय वास्तुविशारद आणि नगररचनाकार चार्ल्स कोरिया यांनी वास्तुरचनाशास्त्रात दिलेल्या योगदानासाठी त्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने ‘चार्ल्स यांच्या स्मारकाची रचना’ हा विषय निश्चित करण्यात आला होता. कोरिया यांनी आधुनिक भारतीय वास्तूरचना शास्त्रात महत्वपूर्ण योगदान दिले असून, अहमदाबाद येथील साबरमती आश्रम, मध्यप्रदेश विधानसभा इमारत, जयपूर येथील जवाहर कला केंद्र अशा महत्वपूर्ण इमारतींची रचना त्यांनी केली आहे. तसेच नवी मुंबई शहराचे ते प्रमुख नगररचनाकार होते.
या वर्षी स्पर्धेच्या परीक्षकांमध्ये चार्ल्स कोरिया यांच्या कार्याशी संबंधित असलेले केप टाउन येथील युआरबीए’चे संस्थापक हेन्री कॉमरी, गोव्यातील आर्टेस रूट्स कोलॅबोरेटिव्हचे संस्थापक प्रा. दुर्गानंद बलसावार, मुंबईच्या आगशीकर आर्किटेक्ट्स’चे प्रमुख आर्किटेक्ट सचिन आगाशीकर या तज्ज्ञ वास्तुविशारदांचा समावेश होता.
पुण्यातील रोहन बिल्डर्स ‘चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक सुहास लुंकड आणि बेंगळुरू येथील माइंडस्पेस आर्किटेक्ट्स’चे संजय मोहे यांनी ही आर्किटेक्चर स्पर्धेची संकल्पना सादर केली. आर्किटेक्चरच्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रातील वास्तविक आव्हानांचा सामना करता यावा, त्यांना जागतिक स्तरावरील डिझाइनबाबत माहिती मिळावी, या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली जाते.
