Friday, May 29, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

प्रशांत जगताप यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिलिव्हरी बॉय ची उपमा दिली


पुणे:राज्यात आगामी काळात महत्त्वाच्या पालिका निवडणुका होऊ घातल्या असून त्याअनुषंगाने सर्वच पक्षांनी आपापल्या पद्धतीने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातील वातावरण हळूहळू तापू लागलं आहे.
एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत कुरघोडी करण्याचा प्रयत्न राजकीय नेतेमंडळी करताना दिसत आहेत. एकीकडे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असे शिवसेनेतलेच दोन गट एकमेकांना भिडताना दिसत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लक्ष्य करत त्यांना ‘डिलीव्हरी बॉय’ची उपमा दिली आहे. त्यामुळे यावरून राष्ट्रवादी शिंदे गटातील आरोप प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.
राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ‘तीन महिन्यांपूर्वीच आम्ही फटाके फोडले’. असं म्हणत ठाकरे सरकार पाडल्याच्या घटनेचा संदर्भ दिल्यानंतर त्यावर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र, त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनाच शिंदे गट प्रमुख मानत असताना आणि भाजपाकडूनही एकनाथ शिंदेंचा उल्लेख सातत्याने त्याच संदर्भात केला जात असताना नेमक्या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर अध्यक्ष आणि पुण्याचे नगरसेवक प्रशांत जगताप यांनी लक्ष्य केलं आहे.
प्रशांत जगताप यांनी आपल्या ट्विटर हँडलवरूर एकनाथ शिंदेंना लक्ष्य करणारं ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील आमदार फोडून भाजपाच्या गोटात सामील केल्याचा आरोप केला आहे. अनेकांना वाटलं शिंदे साहेब लीडर आहेत. पण प्रत्यक्षात मात्र ते केवळ डिलीव्हरी बॉय निघाले. शिवसेनेतून आमदार भाजपामध्ये सुखरूप पोहोचवण्याचं काम ते करतायत. अशा शब्दांत प्रशांत जगताप यांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्र सोडलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading