परदेशी विद्यार्थ्यांनी लुटला दिवाळीचा आनंद…
आयसीसीआर आणि पुणे विद्यापीठातील आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे आयोजन
पुणे : अफगाणिस्तान, चीन, कंबोडिया, इंडोनेशिया, इराक, श्रीलंका, नेपाळ, व्हिएतनाम, इथोपिया, येमेन अशा विविध देशांतून पुण्यात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी हिंदी, मराठी गीतांच्या ठेक्यावर ताल धरत, भाषांच्या सीमा ओलांडून दिवाळीचा आनंद लुटला. विशेष म्हणजे आपापल्या देशातील पारंपरिक वेष परिधान करीत तर काही विद्यार्थी कौतुकाने भारतीय पेहरावात या सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाअंतर्गत असलेल्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या पुणे विभागीय कार्यालय (आयसीसीआर) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या आंतरराष्ट्रीय केंद्रातर्फे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात दिवाळी फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. संजीव सोनवणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला, आंतरराष्ट्रीय केंद्राचे संचालक प्रा. विजय खरे मंचावर होते.
दिवाळीनिमित्त आयसीसीआर कार्यालय आणि संत ज्ञानेश्वर सभागृहात आकर्षक रांगोळी काढून, दिव्यांची रोषणाई करण्यात आली होती. भारतीय परंपरेप्रमाणे परदेशी विद्यार्थी-विद्यार्थिनींचे तर परदेशी विद्यार्थिनींनीही प्रमुख अतिथींचे औक्षण केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते सुरुवातीस दीपप्रज्वलन झाले.
भारतीय परंपरा, भारतीयांची जीवनप्रणाली आणि शेती व्यवसायाशी असलेले नाते या अनुषंगाने प्रा. डॉ. सोनवणे यांनी दिवाळी सणाचे आणि दिव्यांचे महत्त्व विशद केले. परदेशातून भारतात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय सण-उत्सवांची माहिती व्हावी या उद्देशाने दिवाळी फेस्टिव्हलचे आयोजन केले असल्याचे प्रा. खरे म्हणाले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी विद्यार्थ्यांनी फटक्यांच्या आतषबाजीचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. भारती कोकिळ यांनी केले तर संयोजन आयसीसीआरच्या कार्यक्रम अधिकारी संजीवनी स्वामी आणि प्रा. डिम्पल चौधरी यांनी संयोजन केले. आयसीसीआरच्या विभागीय निदेशक निशी बाला यांनी आभार मानले.
