fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

हवा गुणवत्ता सुधारणेच्या पुण्याच्या प्रयत्नांचा जागतिक पातळीवर गौरव

पुणे : वायू प्रदुषणाच्या समस्येला तोंड देण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमध्ये अधिकाधिक ई-बसेसचा समावेश करत पुणे शहराने हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. याच प्रयत्नांची दखल जागतिक पातळीवरील जवळपास १०० अग्रेसर शहरांच्या समूहाने घेतली असून ‘युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीद’ या गटात पुणे शहराची पुरस्कारासाठी निवड केली आहे.

हवामान बदलाच्या समस्यांना तात्काळ प्रतिसाद देत उपाययोजना करणाऱ्या जगातील जवळपास १०० अग्रेसर शहरांचा ‘सी-४०’ हा समूह कार्यरत आहे. या समुहामार्फत हवामान बदलाच्या समस्यावर उपाययोजनांसाठी विविध क्षेत्रात केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करुन समुहात समाविष्ट शहरांना प्रोत्साहन दिले जाते. या समुहाने अर्जेंटिना देशातील ब्यूनास आयरेस शहरात झालेल्या कार्यक्रमात पुणे शहराला ‘सी-४०’ सिटीज ब्लूमबर्ग फिलानथ्रोपीज अ‍ॅवार्डस’चे विजेते म्हणून जाहीर केले आहे.

‘युनायटेड टू ॲक्सलरेट इमिडिएट ॲक्शन इन क्रिटीकल सेक्टर्स’, ‘युनायटेड टू क्लीन द एअर वुई ब्रीद’, ‘युनायटेड टू बिल्ड रेझिलीएन्स’, ‘युनायटेड टू इनोव्हेटीव्ह, ‘युनायटेड टू बिल्ड अ क्लायमेट मूव्हमेंट अशा पाच गटात यावर्षी पुरस्कार देण्यात आले. त्यापैकी हवेच्या गुणवत्तेबाबतचा पुरस्कार पुणे शहराला जाहीर करण्यात आला. पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार हे या कार्यक्रमास ऑनलाईनरित्या उपस्थित होते.

शहरातील वायू प्रदुषणाच्या समस्येवर उपाययोजनेंतर्गत उत्सर्जन कमी करणे, हवेची गुणवत्ता वाढण्यासाठी उपाययोजना करणे आणि त्या माध्यमातून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करणे या निकषांवर पुणे महानगरपालिकेने केलेल्या कामगिरीमुळे शहराचा गौरव करण्यात आला आहे.

शहरात ईलेक्ट्रिक बसेसमुळे उत्सर्जन कमी होण्यासह हवेची गुणवत्ता सुधारण्यात मदत होत आहे. पुणे महानगरपालिकेने पीएमपीएमएलच्या ताफ्यात जास्तीत जास्त ई-बसेस समाविष्ट करण्यावर भर दिला आहे. ई-बसेसच्या वापराचे विविध फायदे असून सर्व बसेसच्या आयुर्मान कालावधीत पेट्रोल व डिझेलवरील वाहनांच्या तुलनेत सुमारे साडेसहाशे कोटी रुपयांची बचत होऊ शकेल. तसेच सुमारे ३ हजार कार रस्त्यावरुन काढून घेतल्यामुळे जेवढे उत्सर्जन कमी होईल तेवढे या बसेसच्या वापरामुळे कमी होऊ शकेल. यासाठी सर्व बसेस या दिव्यांगस्नेही असल्यामुळे तसेच काही बसेस केवळ महिलांसाठी चालवण्यात येत असल्यामुळे सर्वच घटकातील नागरिकांना या बसेसचा वापर सुरक्षित आणि सुलभ वाटतो.

‘विक्रम कुमार, आयुक्त, पुणे महानगरपालिका- शहराला ‘ सी-४०’ पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. वाहतूक व्यवस्थेत कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचा हा गौरव आहे. सार्वजनिक वाहतुकीत विद्युत बसेसचा गतीने समावेश करुन स्वच्छ आणि शाश्वत दळणवळणाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. ई-बसेसचा आमचा हा उपक्रम इतर शहरांनाही मार्गदर्शक आणि प्रेरक ठरु शकेल अशा स्वरुपाचे मॉडेल तयार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading