‘पी. एन. सुरतवाला करंडक’ महिलांच्या १५ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेचे आयोजन !
पुणे : ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी तर्फे ‘पी. एन. सुरतवाला करंडक’ (कै. श्रीमती पुष्पाबेन नटवरलाल सुरतवाला) महिलांच्या १५ वर्षाखालील ५०-५० षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा २१ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर २०२२ या कालावधीत होणार आहे.
या स्पर्धेबाबत अधिक माहिती देताना स्पर्धेचे संचालक मनीष सुरतवाला यांनी सांगितले की, स्पर्धेचे हे उद्धघाटनाचे वर्ष असून मुली आणि महिलांच्या १५ वर्षाखालील वयोगटासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील ८ क्लब संघ या आंतरक्लब स्पर्धेत सहभागी झाले आहे. स्पर्धेचा प्रत्येक सामना हा ५०-५० षटकांचा असणार आहे.
ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी-येवलेवाडी, व्हेरॉक क्रिकेट अॅकॅडमी-थेरगांव आणि आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमी-मगरपट्टा या तीन मैदानांवर स्पर्धेचे सामने होणार आहेत. स्पर्धेचे सामने गटसाखळी आणि बाद फेरीमध्ये होणार आहेत.
या स्पर्धेत ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी, गॅरी कर्स्टन क्रिकेट इंडिया, किल्क् फिल्क् स्पोर्ट्स अरेना, सांगली गर्ल्स्, आर्यन्स् क्रिकेट अॅकॅडमी, व्हेरॉक क्रिकेट अॅकॅडमी, एच.के. बाऊंस क्रिकेट अॅकॅडमी, ए. के. स्पोर्ट्स या ८ निमंत्रित संघांमध्ये विजेतेपदाची चुरस पहावयास मिळणार आहे, मनीष सुरतवाला यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्या संघाला २१ हजार रूपये आणि करंडक तसेच, उपविजेत्या संघाला ११ हजार रूपये आणि करंडक मिळणार आहे. याशिवाय सर्वोत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, उदयोन्मुख खेळाडू याबरोबरच मालिकेचा सर्वोत्कृष्ट खेळाडू ही वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सामन्यासाठी सामनावीर आणि फायटर ऑफ द मॅच अशी पारितोषिके देण्यात आहेत.
स्पर्धेचे उद्धघाटन कर (जीएसटी) विभागाचे माजी अतिरिक्त आयुक्त प्रशांत सातव आणि के. रहेजा कॉर्पोरेशनचे उपाध्यक्ष तुषार येवले यांच्या हस्ते होणार आहे. स्पर्धेच्या उद्घाटनाचा सामना ब्रिलीयन्ट् स्पोर्ट्स अॅकॅडमी आणि किल्क् फिल्क् स्पोर्ट्स अरेना या दोन संघांमध्ये होणार आहे, मनीष सुरतवाला यांनी सांगितले.
