ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या ‘कथित शिवलिंगा’ च्या कार्बन डेटिंगची मागणी फेटाळली
वाराणसी : वाराणसीच्या ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या ‘कथित शिवलिंगा’ची कार्बन डेटिंग होणार नाही. शिवलिंगासारख्या सापडलेल्या संरचनेचे वय, लांबी आणि रुंदी शोधण्यासाठी पुन्हा एकदा सर्वेक्षण करण्यात यावे ही मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. शुक्रवारी वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टात सुनावणी झाली. ५८ जणांना कोर्टात प्रवेश देण्यात आला. हिंदू आणि मुस्लिम पक्षकार, त्यांचे वकील यांच्या उपस्थितीत न्यायालयाने हा निकाल दिला.
याचिकाकर्त्या महिलांपैकी राखी सिंग कोर्टात हजर नव्हत्या. इतर चार याचिकाकर्त्या सीता साहू, मंजू व्यास, रेखा पाठक आणि लक्ष्मी देवी कोर्टात पोहोचल्या. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) ने ज्ञानवापी मशिदीच्या वजूखानामध्ये सापडलेल्या कथित शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी करण्याची मागणी केली होती.
ज्ञानवापी-मां शृंगार गौरी प्रकरणाच्या सुनावणीसाठी याचिकाकर्त्या त्यांच्या वकिलांसह जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात जाताना. ज्ञानवापी-मां शृंगार गौरी प्रकरणाच्या सुनावणीसाठी याचिकाकर्त्या त्यांच्या वकिलांसह जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात जाताना.
मसाजिद समितीने म्हटले आहे की, कथित शिवलिंगाची वैज्ञानिक तपासणी करण्याची गरज नाही. हिंदू पक्षाने आपल्या प्रकरणात ज्ञानवापीमध्ये प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे देव-देवतांची पूजा करण्याची मागणी केली आहे. मग शिवलिंगाच्या तपासणीची मागणी का करत आहेत? ज्ञानवापीत आयोगाच्या वतीने पुरावे गोळा करण्याची मागणी हिंदू पक्ष करत आहे. दिवाणी प्रक्रिया संहितेत अशी कोणतीही तरतूद नाही.
