Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

विज्ञान क्षेत्रातील भेदभाव दूर करण्यासाठी विविध प्रयत्न सुरु – तज्ज्ञांचे मत

पुणे  : विज्ञान शिक्षण,संशोधन आणि या क्षेत्रातील करिअर यांमध्ये आजही वेगवेगळ्या प्रकारातील भेदभाव दिसून येतो. मग तो लैंगिक असेल, शिक्षणाच्या अथवा कामाच्या संधींबाबत असेल किंवा आणखी काही, भेदभाव हा आहेच. पण सकारात्मक बाब म्हणजे, हे भेदभाव कमी करण्याच्या दिशेने विविध प्रयत्न केले जात असून, नजीकच्या भविष्यात विज्ञान क्षेत्रातील भेदभाव नक्कीच कमी होतील, असा विश्वास विज्ञान शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.

पुण्यातील ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे ‘विज्ञानातील समान संधी’ या उपक्रमाचे उदघाटन संस्थेच्या बोट क्लब रस्ता येथील प्रांगणात करण्यात आले. यावेळी राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे (एससीईआरटी) उपसंचालक विकास गरड, आयसर येथील ह्युमनिटीज अँड सोशल सायन्सेस विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. शालिनी शर्मा, सीओईपी महाविद्यालयातील अप्लाईड सायन्स विभागाच्या विभाग प्रमुख नंदिनी अय्यर आणि गोऱ्हे बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेचे सहायक शिक्षक रजनीकांत मेंढे आणि ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनच्या संचालक मिरीयम ब्रुन्स हे उपस्थित होते. ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान होणाऱ्या या उपक्रमांतर्गत  सायन्स फिल्म फेस्टिव्हल आणि विविध कार्याशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उदघाटनप्रसंगी ‘विज्ञानातील समान संधी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात डॉ. शालिनी शर्मा, नंदिनी अय्यर आणि रजनीकांत मेंढे यांनी आपले विचार मांडले. ग्योथं इन्स्टिट्यूट’च्या प्रकल्प व्यवस्थापक वैशाली दाबके या चर्चासत्राच्या समन्वयक होत्या.

मेंढे म्हणाले, “ ग्रामीण भागात पालक मुलांच्या शिक्षणाबाबत जास्त दखल देत नाही, त्यामुळे मुलांनी कोणता विषय शिकावा किंवा कोणता नाही याचा निर्णय हे सर्वस्वी त्या मुलावर अवलंबून असतो. या भागात विज्ञान शिक्षण या विषयाबाबत दोन महत्वाच्या समस्या आहेत, त्यातील पहिली म्हणजे विज्ञान या विषयातील उच्च शिक्षण घेण्यासाठी चांगल्या शैक्षणिक संस्थांची अनुपलब्धता आणि दुसरी म्हणजे शाळेत विज्ञान विषयाचे शिक्षण मातृभाषेत घेतले असल्याने, दहावीनंतर थेट इंग्रजीत या विषयाचे शिक्षण घ्यावे लागत असल्याने भाषेचा मोठा अडसर विद्यार्थ्यांना जाणवतो.’’

विज्ञान शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही शाळेत सायन्स लॅब हा उपक्रम राबवीत असून, याठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रयोगातून विज्ञानाचे धडे दिले जातात, असेही मेंढे यांनी सांगितले.

डॉ. शर्मा म्हणाल्या, “ विज्ञान क्षेत्रात असलेल्या भेदभावांना ओळखून त्यांचा सामना करण्यासाठी प्रत्येकाने सज्ज राहिले पाहिजे. पायाभूत सुविधा आणि संवाद यांच्या सहाय्याने विज्ञान शिक्षणात सकारात्मकता आणि सर्वसमावेशकता आणली पाहिजे. तसेच विज्ञान विषयाबाबतचा संवाद हा इतर विषयाप्रमाणे सहज स्वरुपात होईल यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. विज्ञान चित्रपट हे नागरिकांना रुचतील, अशा प्रकारात तयार झाले पाहिजे. त्यातूनच विज्ञान या विषयाबाबत नागरिकांमध्ये जास्त आवड निर्माण होईल.’’

अय्यर म्हणाल्या, “ विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित या विषयांबाबत आपल्याला अधिक जागरुकता निर्माण करण्याची गरज आहे. याचे सुरवात शाळा आणि घरांपासून झाली पाहिजे. अनेकदा आपण एखादा विषय का अभ्यासतो, याचे ज्ञान विद्यार्थ्यांना नसते. विद्यार्थ्यांना त्या विषयाचे महत्व समजावून सांगण्याची जबाबदारी ही शिक्षक, पालक आणि तंत्रज्ञ यांच्यावर आहे. विज्ञान हा विषय शिकताना भाषा ही कधीच अडचण ठरू नये, यासाठी आम्ही सीओईपी येथे विविध उपक्रम राबवतो, ज्यामध्ये अभ्यासक्रमाच्या सुरवातीला विद्यार्थ्यांच्या इंग्रजी भाषा,गणित आणि मानसिक क्षमता यांची चाचणी घेतली जाते. तसेच विद्यार्थ्यांसाठी दोन आठवड्यांचा ‘इंडक्शन सेरेमनी’, संबंधित विषयाचे मार्गदर्शक, वरिष्ठ विद्यार्थ्याचे ऐच्छिक सहकार्य कार्यक्रम देखील राबविले जातात. ज्यामुळे विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी अधिक सोयीस्कर वातावरण निर्माण होण्यास मदत मिळते.’’

ग्योथं इन्स्टिट्यूट मॅक्स म्युलर भवनतर्फे ‘विज्ञान विषयातील समान संधी’ या विषयाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत पुणे आणि पिंपरी- चिंचवड परिसरातील काही निवडक शाळांमध्ये विज्ञान चित्रपट दाखविण्यात येतील. त्याचबरोबर संबंधित विषयावर कार्यशाळांचे आयोजनही केले जाणार आहे. यामध्ये संस्थेचे शिक्षक, शाळांमधील शिक्षक, संस्थेचे स्वयंसेवक हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करील. तसेच या कार्याशाळांसाठी आवश्यक साहित्य हे संस्थेतर्फे शाळांना देण्यात येणार आहे, अशी माहिती ग्योथं इन्स्टिट्यूटच्या रेणू जामगावकर आणि वैशाली दाबके ह्यांनी दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading