‘या’ पैकी एक असणार उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला, तसंच शिंदे-ठाकरे यांच्यात सुरू असलेल्या वादावर निकाल येत नाही, तोपर्यंत दोन्ही गटांना शिवसेना हे नाव वापरता येणार नाही. सोमवार दुपारपर्यंत शिंदे आणि ठाकरे गटाला निवडणूक आयोगापुढे पक्षाचं नाव आणि चिन्ह यांचे तीन पर्याय सादर करायचे आहेत. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या फेसबूक लाईव्हमध्ये या तिन्ही पर्यायांबाबत माहिती दिली.
निवडणूक आयोगाला त्रिशूळ, उगवता सूर्य आणि धगधगती मशाल हे चिन्हांचे तीन पर्याय आपण निवडणूक आयोगाला दिले असल्याचं उद्धव ठाकरे फेसबूक लाईव्हमध्ये म्हणाले. तात्पुरत्या वेळेसाठी आपण निवडणूक आयोगाला दिली आहेत. यातलं एक नाव शिवसेना बाळासाहेब ठाकरे, दुसरं नाव शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
अंधेरीची पोटनिवडणूक लागली आहे, त्यामुळे आम्हाला लवकरात लवकर एक नाव आणि चिन्ह द्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून शिवसैनिकांशी आणि जनतेशी संवाद साधला. या संवादाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना पुढचा धोका सांगितला. आज कोजागिरी पौर्णिमा आहे, दिवस आणि रात्र वैऱ्याची आहे. तुम्ही जागे राहा, अजिबात झोपू नका. शांत डोक्याने आत्मविश्वासाने ही लढाई जिंकायची आहे, त्यानंतर आपल्याला आव्हान देणारं कुणीच नसेल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
‘आपण इतके दिवस सहन केलं, पण आता अती होत आहे. स्वत: शिवसेना प्रमुख व्हायला निघाले आहेत. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क आम्हाला मिळू नये म्हणून खोकेसूरांनी प्रयत्न केले. 40 डोक्यांच्या रावणाने प्रभू श्रीरामचंद्राचं धनुष्यबाण गोठवलं. हा उलट्या काळजाचा कंपू आहे. यांनी आपल्या आईच्याच काळजात कट्यार घुसवली,’ अशी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर केली.
