fbpx
Thursday, April 25, 2024
Latest NewsPUNE

आरोग्य विद्यापीठांसह शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत नवसंकल्पनांच्या निर्मितीला चालना द्यावी : डॉ. अभय जेरे

पुणे, : भारताला स्टार्टअप व इनोव्हेशन क्षेत्रात जगात एक नंबरचा देश बनविण्यासाठी शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करुन, आरोग्य विद्यापीठांसह शैक्षणिक संस्थांनी एकत्र येत नवसंकल्पनांच्या निर्मितीला चालना देण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय शिक्षा मंत्रालयातील मुख्य इनोव्हेशन अधिकारी डॉ. अभय जेरे यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ‘इम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २.०’ या दोनदिवसीय परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. के. व्ही. काळे होते.

कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठ (Krishna Institute of Medical Sciences Deemed to be University – KIMSDU) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रिसर्च पार्क फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे विद्यापीठात तंत्रज्ञानाच्या व्यावसायिकरणासाठी वैद्यकीय, औषधनिर्माण व संबंधित विज्ञानातील नवकल्पना अर्थात ‘इम्पॅक्ट २.०’ या दोनदिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, रिसर्च पार्क फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. डी. शाळीग्राम कृष्णा अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अगरवाल होते.

उद्‌घाटनानंतर डॉ. जेरे म्हणाले, वैद्यकीय क्षेत्रात नवकल्पनांना मोठा वाव आहे. कोविड काळात आरोग्य क्षेत्राचे महत्व संपूर्ण जगात वाढल्याचे प्रकर्षाने जाणवले. पण आजही भारतात वैद्यकीय उपकरणांची मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. अशावेळी तंत्रज्ञानाचे भारतीयकरण करण्याची गरज आहे. जेव्हा दोन विद्याशाखा एकत्र येऊन काम करतील, तेव्हा मोठ्या प्रमाणात नवकल्पना साकारल्या जातील. संशोधनातून तयार होणारे उत्पादन हे फक्त सर्जनशील नको, तर व्यावसायिकदृष्ट्याही दर्जेदार व वापरण्यास सुलभ असले पाहिजे.

एकीकडे चीन वेगवेगळ्या संशोधनांच्या पेटंटसाठी जवळपास १५ लाख प्रस्ताव दाखल करत असताना, भारतात मात्र फक्त ५५ हजार प्रस्ताव दाखल होतात. याचा अर्थ भारत संशोधनात मागे आहे अथवा भारतीयांमध्ये नवकल्पनांची कमतरता आहे, असा नाही. तर नवकल्पनांचे योग्य मार्गातून सादरीकरण कसे करावे व त्या प्रत्यक्षात कशा साकाराव्यात याचे ज्ञान नसल्याने आपण मागे पडत आहोत. म्हणूनच शालेय स्तपासूनच नवकल्पनांना प्रोत्साहन देऊन, सर्वस्तरावर अशा परिषदांचे सातत्याने आयोजन करुन कल्पनांचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे. यातूनच भविष्यातील विकसित भारत घडविणे शक्य होईल, असा विश्वास डॉ. जेरे यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरु डॉ. के. व्ही. काळे यांनी या परिषदेमुळे नवसंकल्पनांना चालना मिळून, विद्यार्थ्यांनी केलेल्या संशोधन सादरीकरणाला योग्य व्यासपीठ मिळण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, कृष्णा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनीही मनोगत व्यक्त केले. परिषदेत निती आयोगाचे माजी अतिरिक्त सेक्रेटरी तथा अटल इनोव्हेशन मिशनचे संचालक रामानन रामनाथन, महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षण व संशोधन परिषदेच्या संचालिका डॉ. मृदुला फडके ऑनलाईन पद्धतीने सहभागी झाले होत्या. डॉ. ए. डी. शाळीग्राम यांनी स्वागत केले. डॉ. डी. के. अगरवाल यांनी प्रास्तविक केले. परिषदेचे समन्वयक डॉ. जयंत पवार यांनी आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading