fbpx

सत्ताबदलाच्या काळात गांधीविचार विसरू नये : सुशीलकुमार शिंदे

पुणे : गांधी, नेहरु, शास्त्री ही आपली दैवते आहेत. सत्ताबदलाच्या काळात आज आपण गांधी, नेहरू, शास्त्री विसरत चाललो आहोत. गांधी- नेहरूंची काँग्रेस आता कमी झाली आहे. अशा परिस्थितीत महात्मा गांधींच्या प्रेरणेतून सर्व धर्मसमभाव आचरणात आणला पाहिजे. गांधी स्मारक निधी, युक्रांदने त्यात योगदान देत राहावे, अशी अपेक्षा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनीवारी व्यक्त केली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी तर्फे आयोजित ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी सप्ताहा’चे उद्घाटन शनिवार,१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

पुण्यात गांधीभवन येथे १ ते ७ ऑक्टोबर २०२२ दरम्यान या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. भजन, शांती मार्च, व्याख्याने, खादी वस्तूंचे प्रदर्शन असे कार्यक्रम या गांधी सप्ताहात होणार आहेत. गांधी सप्ताह आयोजनाचे हे ११ वे वर्ष आहे. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन होते.

राष्ट्रभक्ती आणि जातीयता निर्मूलनाचे काम देशात महात्मा गांधींनी केले. त्यांच्या प्रेरणेने नेहरूंनी समाजवादी समाजरचना आणली. गरीबी श्रीमंतीची दरी कमी होत नाही. लोकसंख्या वाढीने प्रश्न अजून जटील होत आहे. अशा वेळी गांधीविचार विसरून चालणार नाही.

महात्मा गांधींनी आफ्रिकेतील कारकिर्दीपासून समाजसेवा सुरू केली. कॉंग्रेसमध्ये , देशात त्यांनी सेवाभाव, अस्पृश्यता निर्मूलन रुजविले. त्यांच्याच सर्व धर्मसमभावाच्या प्रेरणेने युवक क्रांती दल ,डॉ. कुमार सप्तर्षी कार्यरत आहेत, असेही शिंदे यावेळी बोलताना म्हणाले.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे सचिव अन्वर राजन, विश्वस्त एम.एस.जाधव ,रमेश कुंडूसकर, नोएल माजगावकर, जांबुवंत मनोहर,नीलम पंडित, अप्पा अनारसे, पल्लवी भागवत, मीना साबद्रा,मौलाना इसाक, ग्यानी अमरजीत सिंग ,फादर पीटर व्यासपीठावर उपस्थित होते. संदीप बर्वे यांनी प्रास्ताविक केले. प्रा.एम.एस.जाधव, सर्व धर्मप्रार्थनेने कार्यक्रमाची सुरवात झाली. संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.राष्ट्रपिता महात्मा गांधी या डॉ.कुमार सप्तर्षी लिखित पुस्तकाचे प्रकाशन सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते झाले.

अध्यक्षस्थानावरून बोलताना अन्वर राजन म्हणाले, ‘ महात्मा गांधी हे संतपरंपरेच्या मालिकेतील व्यक्तीमत्व होते. अस्पृश्यता निर्मूलनाच्या त्यांच्या कार्यावर, जातीव्यवस्था नाकारण्यावर पुण्यातील धर्मवादी नाराज होते. ज्या शक्तींना मूळ धारेतून आपण बाजूला ठेवले, त्या फॅसिस्ट शक्ती बळकट होत आहेत. हे आव्हान समविचारी पक्ष, संस्था, संघटनांनी गांधी विचाराच्या साहाय्याने पेलले पाहिजे.

Leave a Reply

%d bloggers like this: