fbpx
Friday, April 26, 2024
Latest NewsPUNE

आपला इतिहास, आपला समाज आणि आपले ज्ञानविश्व समजून घेण्यासाठी पाली शिकणे आवश्यक – डॉ. गणेश देवी

पुणे:सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे दि. १७ सप्टेंबर २०२२ रोजी पंधरावा पाली दिन विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात उत्साहात साजरा करण्यात आला. भारतात पाली व बौद्ध अध्ययनाचे पुनरुज्जीवन करणाऱ्या अनागारिक धर्मपाल या सिंहली विद्वानांचा हा १५८ वा जन्मदिन. त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पाली व बौद्ध अध्ययन विभागातर्फे हा दिवस दर वर्षी साजरा केला जातो.
विभागातील विद्यार्थ्यांनी पाली सुत्तपठन, पाली भाषेतून संवाद, कथा-अभिवाचन, भीमगीत, अनागारिक धर्मपाल, भिक्षू जगदीश कश्यप, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि उर्ग्येन संघरक्षित यांच्या जीवनकार्याचा आढावा घेणारी भाषणे, एकपात्री प्रयोग, कवितावाचन, पाली बडबडगीत, पाली साहित्याचा आढावा, सांगणिकपाली, आणि बौद्ध धर्माचे सामाजिक उपयोजन या विषयांवरील सादरीकरण इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रम या निमित्ताने सादर केले. पाली दिनाचे औचित्य साधून वैशाली सोनावणे व लक्ष्मीकांता माने या विद्यार्थिनींनी तसेच तृप्तीराणी तायडे व दीपक शाक्य या प्राध्यापकांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पाली आणि इंग्रजी भाषेत केले.

पाली दिन फक्त पाली भाषेचा गौरवदिन नसून बौद्ध धर्माशी संबंधित बौद्ध संकर संस्कृत, अपभ्रंश, गांधारी आणि सैंधवी प्राकृत अशा विस्मरणात गेलेल्या सर्व भाषांचा व बहुभाषिक बौद्ध संस्कृतीचा तो गौरवदिन आहे. या सगळ्या भाषांना सोबत घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत अशा शब्दात या दिवसाचे औचित्य विभागप्रमुख डॉ. महेश देवकर यांनी विशद केले.

भगवान बुद्धांना जिथे ज्ञानप्राप्ती झाली त्या बोधगयेचा महाविहार स्वतंत्र करण्यासाठी अनागारिक धर्मपालांनी जे प्रयत्न केले ते पूर्णत्वाला नेण्यासाठी चळवळ उभी करण्याची गरज आहे. त्याची सुरुवात महाराष्ट्रातून व्हावी अशी अपेक्षा कार्यक्रमाचे विशेष अतिथी व माजी आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी या वेळी व्यक्त केली. डॉ बाबासाहेब आंबेडकर पाली भवन व संशोधन केंद्राच्या इमारतीसाठी राज्य सरकारकडून निधी प्राप्त झालेला आहे. तिचे भूमिपूजन लवकरच होईल. संपूर्ण पाली तिपिटकाचा मराठी अनुवाद करण्याचा प्रकल्पही लवकरच डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (बार्टी) विद्यापीठात कार्यान्वित होईल अशी आशाही त्यांनी बोलून दाखवली.

पद्मश्री डॅा गणेश देवी यांनी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलताना जर या देशाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर पालीला स्पर्श केल्याशिवाय तो समजेलच कसा असा प्रश्न उपस्थित केला. भारताच्या भाषिक ताण्याबाण्यांचा इतिहास समजण्यासाठी पाली आणि सर्व प्राकृत भाषा अतिशय महत्त्वाच्या आहेत. समानतेच्या परंपरेची बीजे पाली साहित्यात आहेत असे गौरवोद्गार डॉ देवी यांनी काढले. आपला इतिहास, आपला समाज आणि आपले ज्ञानविश्व समजून घेण्यासाठी पाली शिकणे आवश्यक आहे. वर्तमानकाळाच्या बरोबर राहून भूतकाळाचा अभिमान बाळगणारा देश आपल्याला जर बनायचं असेल तर पाली ज्ञानविश्व आपल्या देशासमोर घेऊन जाणे हे आपले संवैधानिक कर्तव्य आहे असे मत त्यांनी या प्रसंगी मांडले.

मागील दोन वर्षांत विभागातील निरनिराळ्या परिक्षांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या व विद्यापीठ अनुदान आयोगाची नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात प्रशस्तिपत्र, पदक आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दर वर्षी पिंपरी येथील बुद्धघोष चॅरिटेबल ट्रस्टच्या मदतीने हे पुरस्कार देण्यात येतात.
पाली साहित्य अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवण्यासाठीची पहिली पायरी म्हणून पाली दिनाचे औचित्य साधून या वेळी पाली धम्मपद पाठांतर स्पर्धा जाहीर करण्यात आली.

विद्यापीठाचे प्रकुलगुरू प्रा डॉ संजीव सोनावणे यांनी दूरध्वनीच्या माध्यमातून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. सहाय्यक प्राध्यापिका प्रणाली वायंगणकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading