Monday, September 7, 2026
Latest NewsMAHARASHTRA

कौशल्य विकासाच्या कामाला प्रतिष्ठा मिळवून द्या – चंद्रकांत पाटील

सोलापूर : देशामध्ये बेरोजगारांच्या हाताला काम मिळावे, छोटे-मोठे व्यवसाय, धंदा करून रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रत्येक बेरोजगारांना शासकीय नोकरी मिळत नाही. बेरोजगार युवांनी कोणत्याही गोष्टीला कमी न मानता कौशल्य विकासचे प्रशिक्षण घेऊन रोजगाराभिमुख व्हावे. या कौशल्य विकासाच्या कामाला, नव्याने व्यवसाय करणाऱ्यांना प्रतिष्ठा मिळवून देण्याचे आवाहन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे कौशल्य विकास अभ्यासक्रमाचा पहिला दिक्षांत समारंभ, हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पाटील बोलत होते. यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस, प्रभारी प्र कुलगुरू व्ही. बी. पाटील, प्रभारी कुलसचिव सुरेश पवार आदी उपस्थित होते.

बाजाराची गरज ओळखून कौशल्याचे प्रशिक्षण आवश्यक
पाटील यांनी सांगितले की, राज्यात साडेबारा कोटी जनतेपैकी 20 लाख सरकारी नोकऱ्या आहेत. बाकी खाजगी क्षेत्र, व्यवसाय यामध्ये काम करतात. नोकरी करणाऱ्यांनी त्यांचे कौशल्य वाढविणे आवश्यक आहे. सध्या मुलांना शिक्षणासोबतच कौशल्य शिक्षण देणे काळाची गरज बनली आहे. प्रत्येक क्षेत्रातील बेरोजगारी घालविण्यासाठी कौशल्य विकासशिवाय पर्याय नाही. यामधील प्रशिक्षणही विकसित करून बाजाराची गरज ओळखून कौशल्याचे प्रशिक्षण निर्माण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

अहिल्यादेवींच्या स्मारकासाठी निधी कमी पडणार नाही
अहिल्यादेवी होळकर यांचे काम, त्यांची शौर्याची यशोगाथा, विकासाची हातोटी आणि आध्यात्मिक बैठक यामुळे त्यांचे नाव या विद्यापीठाला दिले आहे. या विद्यापीठाला नाव देऊन न थांबता 14 कोटींचा निधी दिला आहे. विद्यापीठ परिसरात होणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, याची ग्वाही पाटील यांनी दिली. महात्मा बसवेश्वर अध्यासन केंद्राला 4 कोटींचा निधी देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या अंदाजपत्रकासाठी 54 कोटींचा निधी प्रस्तावानुसार मिळेल. कौशल्य विकासासाठी 10 कोटींच्या निधीचीही घोषणा पाटील यांनी केली. राज्याचा लौकिक क्रीडा प्रकारात वाढावा, चांगले खेळाडू तयार व्हावेत, यासाठी खेळाला प्राधान्य देण्यात येत आहे. सोलापूर विद्यापीठाने खेळाचा सर्वंकष आराखडा तयार करावा. खेळाच्या साहित्यासाठी सीएसआर फंडातून मदत मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.

 

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading