आधुनिक तंत्रज्ञानासोबत सुलभतेने साधणार पुणे पीपल्स बँकेचा ‘उत्कर्ष’
पुणे : महाराष्ट्र आणि कर्नाटक अशा दोन्ही राज्यात मिळून पुणे पीपल्स बँकेच्या १५ नवीन शाखाविस्तार, जास्तीत जास्त शासकीय योजनांचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविणे आणि बँकेच्या ठेवी २५०० कोटी तर बँकेचा एकूण व्यवसाय हा ४५०० कोटी पर्यंत वाढविण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत सुलभतेवर भर देणार असल्याचे सांगत उत्कर्ष पॅनलला विजयी करण्याचे आवाहन उत्कर्ष पॅनेलच्या उमेदवारांनी केले आहे.
पुण्यात मुख्य शाखा असलेल्या नामांकित अशा पुणे पीपल्स को ऑप. बँकेची सन २०२२-२०२७ पंचवार्षिक निवडणूक रविवारी (दि. २८) होत आहे. यानिमित्ताने उत्कर्ष पॅनेलचे उमेदवार व बँकेचे विद्यमान अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते, विद्यमान संचालक सीए जर्नादन रणदिवे, बबन हेगडे, बिपीनकुमार शहा, मिलिंद वाणी, निशा करपे, डॉ. रमेश सोनावणे, संजीव असवले, श्रीधर गायकवाड, सुभाष नडे, सुभाष गांधी, वैशाली छाजेड -कोठारी, विश्वनाथ जाधव आदिंनी आवाहन केले आहे.
विद्यमान अध्यक्ष अॅड. सुभाष मोहिते म्हणाले, बँकेचे लवकरच स्वतःच्या भव्य आणि सुसज्ज जागी मुख्य कार्यालय सुरू होणार असून ही २६००० चौरस फुटाची जागा बँकिंग च्या सर्व गरजांसाठी आधुनिकतेने सज्ज होत आहे. त्यामुळे बँकेमध्ये आधुनिक तंत्रज्ञान वापरून कर्मचारी तसेच ग्राहक यांच्यासाठी बँकेचे दैनंदिन व्यवहार सुलभ आणि सोपे करण्यास प्राध्यान्य दिले जाईल. याशिवाय युवक युवतींना बँकेचे खातेदार बनविण्यासाठी आकर्षक योजना राबविण्यासोबतच लवकरात लवकर बँकेच्या सर्व शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत सुरु करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, सन २००७ साली निवडून आलेले विद्यमान संचालक मंडळाने सर्व सभासदांच्या विश्वासाने आणि सहमतीने मागील पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध केली. गेल्या १५ वर्षात एकूण भाग भांडवल रुपये ३ कोटीवरून रुपये २३ कोटी, राखीव निधी ४० कोटी रुपयांवरून १६१ कोटी रुपये, ठेवी २७३ कोटीवरून १२७३ कोटी रुपयांच्या, तर एकूण कर्ज ही १३१ कोटींवरून ८०० कोटी रुपयांपर्यंत तर नफा १.८१ कोटी वरून १५.८९ कोटी पर्यंत वाढलेला आहे. बँकेला सतत अ वर्ग मिळाला आहे व निव्वळ एनपीए १ टक्का च्या आसपास आहे. अशाप्रकारे बँकेच्या प्रगतीचा आलेख हा कायम चढत्या क्रमाने प्रगतीकडेच गेला ही बाब अतिशय प्रेरणादायी आहे. आज आपली बँक आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याचा हा एक पुरावाच असून यावेळी आम्ही उत्तम काम करू शकलो, याचा आनंद आहे.
सीए जर्नादन रणदिवे म्हणाले, अल्प उत्पन्न प्रायोरिटी सेक्टर, सूक्ष्म लघु मध्यम उद्योगांना वाजवी व्याज दराने पत पुरवठा करण्यावर आम्ही भर देणार आहोत. तसेच सर्व शाखांमध्ये पेपरलेस बँकिंग ही तंत्रज्ञान आधारित प्रणाली वापरून पेपर चा वापर कमी करून पर्यावरण पूरक बँकिंग वर भर देण्यात येईल. बचतगट, ग्रामीण भागातील महिला यांच्या पर्यंत आधुनिक बँकिंग च्या सर्व सुविधा पोहोचविणे, बँकेच्या सेवकांचा सामाजिक, शैक्षणिक स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणे आणि औद्योगिक क्षेत्रातील कामगारांना सुलभ पतपुरवठा करीत डॉक्टर्स, वकील, सी. ए. यांच्यासाठी विशेष कर्ज योजना राबविणे यासारख्या अनेक योजना भविष्यात अंमलात आणण्याचा मानस आहे.
यावर्षी बँकेची निवडणूक होत आहे. रविवार, दि. २८ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. पुणे, मावळ, चिंचवड, दौंड, ठाणे आणि बेळगाव या सहा ठिकाणी मतदान केंद्र उभारलेली आहेत. कोणतीही बँक ही समाज मनाचा आरसा असते. प्रत्येक घटकाला ती आपलीशी वाटावी ही जबाबदारी संचालकांची असते. त्यामुळे आपण आमच्या पाठीशी उभे रहाल, असा विश्वास उत्कर्ष पॅनेल च्या उमेदवारांनी व्यक्त केला आहे.
