महा एनजीओ फेडरेशनतर्फे वेश्यावस्तीतील ९० महिलांना धान्य किट
पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील ९० महिलांना एक महिना पुरेल इतके धान्य किट देऊन महा एनजीओ फेडरेशनने ४ था वर्धापनदिन उत्साहात साजरा केला. या भागातील महिलांना वर्षभर आवश्यक ते धान्य देण्यासोबतच आरोग्यसुविधा पुरविण्याचे आश्वासन यावेळी फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी दिले आहे.
वेश्यावस्तीतील वृद्ध व बाधित महिलांना अशा ९० महिलांना वर्षभर पुरेल इतके धान्य व इतर साहित्य देऊन फेडरेशन एका प्रकारे त्यांचे पालकत्व घेत आहे. बुधवार पेठेत झालेल्या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र तापडिया, अंजली तापडिया, पत्रकार निलेश खरे, मंथन फाऊंडेशनच्या प्रमुख आशा भट व दीपक निकम, महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे, अमोल उंबरजे, राहुल पाटील, शशांक ओंभासे , प्रणिता जगताप, गणेश बाकले व अक्षयमहाराज भोसले उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांपैकी सोशल रिस्पॉन्सब्लीटीचे विजय वरुडकर व आर्ट आॅफ लिविंगचे महेश सोनी यांची देखील कार्यक्रमाला उपस्थिती होती.
राजेंद्र तापडिया म्हणाले, महा एनजीओ फेडरेशन संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण भागात देखील कार्यरत आहे. समाजातील वंचित व गरजू घटकांपर्यंत पोहोचून त्यांची सेवा करण्याची संधी फेडरेशनच्या माध्यमातून सामान्यांना मिळत आहे. अंजली तापडिया म्हणाल्या, तिरंग्याचा छत्रछायेखाली आपण सर्व जण एकत्र आहोत. प्रत्येक रंग आपल्याला एक प्रेरणा देतो. भगवा रंग ऊर्जा, पांढरा रंग शांतता, हिरवा रंग उन्नती या सर्व गोष्टी आपल्याला मिळत राहो, असे महिलांना सांगत एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही आपल्या सोबत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
आशा भट म्हणाल्या, महा एनजीओ फेडरेशन सदैव आमच्या प्रत्येक उपक्रमास सहाय्यभूत राहत आम्हाला मदत करते, याचा आम्हाला मोठा फायदा आमच्या सामाजिक कार्यात होतो. मागील दशकापासून आम्ही या भागात सामाजिक कार्य करतोय. बुधवार पेठ येथील समस्या मांडता क्षणी फेडरेशनने त्वरित मदत उपलब्ध केली .
