वसंत मोरेंवर राज ठाकरे यांनी नवीन जबाबदारी सोपावली
पुणे : आगामी २०२४ लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात मनसेही सक्रीय झाल्याचं पाहायला मिळालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेते, सरचिटणीस यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीनंतर मनसेनं विविध लोकसभा मतदारसंघनिहाय निरीक्षक नेमले आहेत. त्यात पुणे ग्रामीण भागातील मावळ, शिरुर आणि बारामती लोकसभेसाठी पक्षाने पुण्यातील नेत्यांना जबाबदारी दिली आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सहीनं पत्रक जारी करण्यात आले आहे. त्यात मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून किशोर शिंदे, हेमंत संभूस, गणेश सातपुते यांची निवड करण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभा मतदारसंघात अजय शिंदे, बाळा शेडगे आणि बारामती लोकसभा मतदारसंघात वसंत मोरे, सुधीर पाटसकर, रणजित शिरोळे यांना निरीक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
पुणे मनसेतील संघटनात्मक बदलानंतर अनेक अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले. त्यानंतर वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा सुरू झाली. शिवसेना, भाजपासह अनेक पक्षांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्याची ऑफर दिली. परंतु वसंत मोरे हे राज ठाकरेंशी एकनिष्ठ राहिले. शिवतीर्थवरील बैठकीत वसंत मोरे यांची समजूत काढण्यात राज ठाकरे यांना यश आले. त्यानंतर कात्रज भागात मनसेचे नगरसेवक निवडून आणणार या भूमिकेतून ते काम करू लागले. त्यातच वसंत मोरे यांना राज ठाकरेंनी नवी जबाबदारी देत बारामती लोकसभा मतदारसंघात निरीक्षक म्हणून पाठवलं आहे.
