fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

उलगडला क्रांतिकारकांचा धगधगता इतिहास

पुणे : स्वत:ची आणि कुटुंबाची पर्वा न करता देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्रसंगी प्राणांची बाजी लावणार्या क्रांतिकारकांचा धगधगता इतिहास ‘उनकी याद करे’ या महानाट्यातून उलगडत गेला आणि उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या मनात देशभक्तिचे स्फुल्लिंग चेतविले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या (डीईएस) वतीने या महानाट्याचे आयोजन करण्यात आले होते.

रॅंडचा वध करणार्या चाफेकर बंधूंचा पराक्रम, लोकमान्य टिळक आणि शि. म. परांजपे यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेली विदेशी कपड्यांची होळी, ब्रिटिशांचे कर्दनकाळ मदनलाल धिंग्रा यांनी केलेली कर्झन वायलीची हत्या, जालियनवाला बाग हत्याकांडानंतर निर्माण झालेला असंतोष, शहीद भगतसिंग आणि चंद्रशेखर आझाद यांचे बलिदान आणि सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना व त्यांचे ऐतिहासिक भाषण असे अंगावर रोमांच उभे करणारे स्वातंत्र्य चळवळीतील निवडक प्रसंग संगीत, नृत्य, नाट्य, अभिनय आणि दृक-श्राव्य माध्यमांतून सादर करण्यात आले.

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ‘उनकी याद करे’ या कवितेवर आधारित या महानाट्याची निर्मिती करण्यात आली होती. दिग्पाल लांजेकर यांनी लेखन, दिग्दर्शन आणि देवदत्त बाजी यांनी संगीत दिले होते. गौरी छत्रे यांनी नृत्य, सुरज पारसणीस व योगेश सप्रे यांनी दिग्दर्शन सहाय्य, सुजय भडकमकर यांनी प्रकाश व्यवस्था केली होती. केतकी अभ्यंकर यांनी मुख्य समन्वयिका म्हणून जबाबदारी पार पाडली.

भारतीय युवकांची ताकद जगाला मार्गदर्शन करेल – खासदार जावडेकर

विकासाची दृष्टी ठेवून देशाने जे राजकारण केले त्याचा परिणाम म्हणजे अन्नधान्य, दुग्धपुरवठा, शस्त्रास्त्र निर्मिती, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, माहिती-तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये भारताने मोठी प्रगती केली. विविध क्षेत्रांत भारत स्वयंपूर्ण तर झालाच पण आपली निर्यातही मोठ्या प्रमाणात वाढली. त्याचा परिणाम म्हणजे पाकिस्तानी नागरिकांनाही भारतासारखी प्रगती व्हावी अशी अपेक्षा निर्माण झाली ब्रिटिशांनी जाता जाता देशाची फाळणी केली. पण सांस्कृतिकदृष्ट्या संपूर्ण उपखंड एकच आहे याची आपण आठवण ठेवायची आहेभारतात सर्वाधिक युवक असणारा तरुण देश आहे. ही युवकांची ताकद जगाला मार्गदर्शन करू शकेल देशाला अभिमान वाटेल असे कार्य त्यांच्या हातातून घडेल असा विश्वास खासदार प्रकाश जावडेकर यांनी महानाट्याच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केला. डीईएसचे अध्यक्ष डॉ. शरद कुंटे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यवाह प्रा. धनंजय कुलकर्णी, बीएमसीसीच्या प्राचार्या डॉ. सीमा पुरोहित, दिग्पाल लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

शोभायात्रांमध्ये दहा हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि अखंड भारत स्मरण दिना निमित्त डीईएसच्या वतीने शहराच्या विविध भागांतून तीन शोभायात्रा काढण्यात आल्या होत्या. डीईएसच्या विविध शाळा आणि महाविद्यालयांतील दहा हजारहून अधिक विद्यार्थी पारंपरिक वेशभूषा करून हातात तिरंगे झेंडे घेऊन भारतमातेचा जयघोष करीत सहभागी झाले होते. स्वातंत्र्य सेनानी आणि क्रांतिकारकांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी विशेष आकर्षण होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading