Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

PCMC महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह; राजेश पाटील यांची उचलबांगडी

पिंपरी : ओडिसा केडरचे असलेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांची अवघ्या दीड वर्षांत राज्य सरकारने उचलबांगडी केली आहे. त्यांच्या जागी सातारऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची महापालिका आयुक्तपदी आज (मंगळवारी) नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी आदेश जारी केला आहे.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. सत्ता बदल होताच महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्या बदलीची जोरदार चर्चा रंगली होती. अखेर आयुक्त पाटील यांच्या बदलीचा आज (मंगळवार) आदेश आला आहे. ओडिशा केडरचे 2005 च्या बॅंचचे आयएएस राजेश पाटील यांची आंतरराज्य प्रतिनियुक्तीने पिंपरी पालिकेत 15 फेब्रुवारी 2021 रोजी आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांना आयुक्त म्हणून दीड वर्षाचा कार्यकाळ मिळाला आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी शहर स्वच्छतेवर, तृतीयपंथीयांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासह विविध कामकाज केले आहे. मात्र, प्रशासक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर पाटील यांनी अनेक वादग्रस्त निर्णय मनमानी पध्दतीने घेतले आहेत. यामध्ये महापालिकेच्या नवीन इमारतीची 312 कोटींची निविदा, यांत्रिकी पध्दतीने रस्ते साफसफाईची 328 कोटींचा निविदा प्रसिध्द केल्या आहेत. तसेच महापालिकेच्या सर्व रूग्णालयात शासकीय दरांप्रमाणे केलेली दरवाढ अशा विविध निर्णयांमुळे आयुक्त पाटील यांच्या कारभारावर टीकेची झोड उठविली जात होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading