स्तनपानाबाबत चुकीचे सिद्धांत आणि गैरसमज नाकारले पाहिजेत
पुणे : ” स्तनपान आणि स्तनांच्या आरोग्याबाबत जागरूकता हा एक महत्त्वाचा पैलू आहे. आपल्याकडे स्तनपानाविषयी अनेक गैरसमज आणि नवजात बाळाला सोने आणि मध देण्यासारख्या अवैज्ञानिक सिद्धांतांचा प्रसार विविध माध्यमांद्वारे केला जातो. हे स्त्रीरोगतज्ञांच्या मानक पद्धतीच्या विरुद्ध आहे. बाळाचा जन्म होताच त्याला स्तनपान केले पाहिजे. त्यामुळे बाळामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होतेच शिवाय मतेसाठी रक्तस्त्राव आणि अशक्तपणा तसेच स्तनाचा कर्करोग, एंडोमेट्रिओसिस आणि लठ्ठपणा यासारख्या आरोग्य समस्या कमी करून तिचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, ” असे मत शहरातील प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञांनी व्यक्त केले.
पुणे ऑबस्ट्रेटीक अँड गायनोकोलॉजीकल सोसायटीतर्फे (पीओजीएस) आयोजित ‘ ब्रेस्टकॉन २०२२’ या दोन दिवसीय परिषदेचे उद्घाटन विमाननगर येथील हयात हॉटेल येथे झाले. यावेळी फेडरेशन ऑफ ऑबस्ट्रेटीक अँड गायनोकोलॉजीकल सोसायटीज ऑफ इंडिया’ चे ( एफओजीएसआय) माजी अध्यक्ष डॉ. पी. के. शाह आणि नियोजित अध्यक्ष डॉ. जयदीप टांक यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच पीओजीएस’ चे अध्यक्ष डॉ. पराग बिनीवाले, उपाध्यक्ष डॉ मिलिंद दुगड, डॉ. उमा वानखेडे, सचिव डॉ. आशिष काळे, सदस्य डॉ. मंगला वाणी, डॉ. चारुलता बापये आणि डॉ. स्नेहा भुयार हे यावेळी उपस्थित होते.
डॉ. शाह म्हणाले,” गर्भवती महिलेची सर्वप्रथम तपासणी हे स्त्रीरोगतज्ञ करतात. आणि तिथूनच स्तनपानाची खरी जाहिरात सुरू होते. दुर्दैवाने काही स्त्रीरोगतज्ञ आणि प्रसूती तज्ञ स्तनपानाबाबत जागरूकता आवश्यक मानत नाहीत. त्यामुळेच यासंदर्भातील आकडेवारी आपल्याकडे समाविष्ट केले जात नाही. “
डॉ. बिनीवाले म्हणाले, “ आरोग्य सेवा प्रदाते म्हणून आम्ही महिलांना स्तनपान करण्यासाठी प्रोत्साहन देतो, परंतु दुर्दैवाने जगभरात केवळ ४०-५०% स्त्रिया जन्मानंतर लगेचच स्तनपान सुरू करतात. जर आईकडे दुधाचे प्रमाण कमी असेल तर बाळाला फॉर्म्युला फीड देण्यापेक्षा सप्लिमेंट्स आणि औषधे आईला दिली जाऊ शकतात. स्तनपानाबाबत तर्कहीन सिद्धांतांद्वारे दिशाभूल होण्यापासून दूर राहीले पाहिजे.”
डॉ. टांक म्हणाले, “ काही स्त्रिया वैद्यकीय कारणांमुळे स्तनपान करू शकत नाहीत आणि या स्त्रिया समवयस्कांच्या दबावामुळे अवैज्ञानिक हस्तक्षेपांचा अवलंब करतात. अशा स्त्रियांना स्तनपानाबाबत प्रसूतीतज्ञांकडून योग्य मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे.”
“स्तनाच्या कर्करोगाच्या घटना कमी करण्यासाठी किंवा लवकर निदान व्हावे यासाठी स्तनाच्या आरोग्याचा संदेश देणे आवश्यक आहे. परिषदेच्या माध्यमातून स्तनपानाच्या महत्त्वाला अधोरेखित करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत,” असे डॉ. मंगला वाणी म्हणाल्या.
