fbpx
Wednesday, April 24, 2024
Latest NewsPUNE

गणेशोत्सवात पुणे महापालिका, पोलीस, मंडळांनी स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेवर भर द्यावा – खासदार गिरीष बापट

पुणे : कोविडनंतरचा हा गणेशोत्सव असल्याने सार्वजनिक स्वच्छता आणि आरोग्य सुरक्षेविषयी भर देणे गरजेचे आहे. गणेशोत्सव मंडळांनी महानगरपालिकेशी संपर्क करुन तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करायला हवी. महानगरपालिकेसोबतच पोलिसांनी देखील तात्पुरत्या स्वच्छतागृहांची सोय करावी. पोलिसांकडे नागरिकांकडून मिळालेल्या दंडाची रक्कम मोठया प्रमाणात जमा झाली आहे. उत्सवाकरिता त्याच पुणेकरांच्या पैशातून ५ ते १० कोटी रुपये स्वच्छतेच्या सोयींवर पोलिसांनी खर्च करावे, असे आवाहन खासदार गिरीष बापट यांनी केले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा २०१९ च्या पुणे शहर महापालिका क्षेत्र विभागाचा पारितोषिक वितरण सोहळा गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, अंकुश काकडे, मोहन जोशी, रवींद्र माळवदकर, वर्षा तापकीर, ट्रस्टचे डॉ.रामचंद्र उर्फ बाळासाहेब परांजपे, सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण, कुमार वांबुरे, अक्षय गोडसे, अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते.
नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. तर, श्री सुभाषनगर माडीवाले वसाहत गणेशोत्सव मंडळाने द्वितीय, कॅम्पमधील श्रीकृष्ण तरुण मंडळाने तृतीय, नाना पेठेतील काळभैरवनाथ तरुण मंडळाने चौथे तर सिटी पोस्ट चौक बुधवार पेठेतील महाराष्ट्र तरुण मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले आहे. विजेत्यांना अनुक्रमे ५१, ४५, ४०, ३५ आणि ३० हजार रुपये व चषक असे पारितोषिक देण्यात आले. यंदाचा जय गणेश भूषण पुरस्कार धनकवडीतील आदर्श मित्र मंडळाला देण्यात आला. रुपये १ लाख व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप होते.
गिरीष बापट म्हणाले, गणेशोत्सवात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी स्वयंस्फूर्तीने आपापल्या भागातील वाहतूक, दर्शन रांग, ज्येष्ठ व महिलांना प्राध्यान्य अशी सेवा द्यायला हवी. गणेशोत्सवात मंडपाशेजारील क्लब पूर्णपणे बंद व्हायला हवे. दारुमुक्त उत्सव साजरा होण्यासोबतच महिला सुरक्षेवर मंडळे आणि पोलिसांनी भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले.
अमिताभ गुप्ता म्हणाले, गणेशोत्सव मंडळांचे जाहिरातींवर उत्पन्न अवलंबून आहे. त्यामुळे बॉक्स कमानी व इतर बाबतीत आम्ही निश्चितच सहकार्य करु. कोणालाही त्रास देणे हे पोलिसांचे धोरण नाही. आम्ही तुमचे सेवक आहोत. गणेशोत्सव ही पोलिसांसाठी अग्निपरीक्षा असते, आम्ही नक्कीच ती यशस्वीपणे पार पाडू.
मोहन जोशी म्हणाले, सध्या वर्गणी मिळणे, ही मंडळांसाठी अडचण झाली आहे. जाहिरातीच्या उत्पन्नावर उत्सव साजरा होतो. त्यामुळे बॉक्स कमानी व जाहिरातींविषयी सवलत व शिथीलता द्यावी, असेही त्यांनी सांगितले. गणेश विसर्जनाच्या दिवशी सगळे रस्ते बंद केले जातात. परंतु काही मार्ग मोकळे ठेवणे गरजेचे आहे. छोटया गल्ल्या बंद करु नका, अशी विनंती अंकुश काकडे यांनी केली.
प्रास्ताविकात हेमंत रासने म्हणाले, मागील ४० वर्षे सातत्याने स्पर्धेचे आयोजन केले जाते. लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेतून वेगवेगळ्या शक्ती स्वातंत्र्यासाठी  निर्माण झाल्या. गणेशोत्सवातून संघटन निर्माण झाले. त्यामुळे आज सलग १३० वर्षे हा उत्सव सुरु आहे. मंडळांना मांडवाची, पोलिसांची व एमएसईबी ची परवानगी घ्यावी लागते. त्या परवानग्या सुटसुटीतपणे व लवकर मिळाव्या, असेही त्यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी झालेल्या १६२ मंडळांपैकी ११२ मंडळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १५ लाख ९ हजार रुपयांची बक्षिसे या मंडळांना देण्यात आली. स्पर्धेच्या परीक्षण मंडळात पराग ठाकूर, डॉ.अ.ल.देशमुख, विजय चव्हाण, कै. अनिल घाणेकर, मधुकर जिनगरे, बापू पोतदार, सुधीर दारव्हेकर, जयश्री बोकील यांसह सहाय्यक म्हणून बाळकृष्ण घाटे, लिंगराज पाटील, शुभम साळुंके, सौरभ साळेकर, दीप राणे यांनी काम पाहिले. महेश सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading