Friday, May 15, 2026
Latest NewsPUNE

शनिवारवाडयासमोर मानवी मनोरे करुन गणेशोत्सव कार्यकर्त्यांची मानवंदना

पुणे : लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगतसिंग, स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांसारख्या स्वातंत्र्यसेनानींच्या छायाचित्रांचे फलक हातात घेत पुण्यातील ७५ गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सव कार्यकर्ता एकता रॅली काढली. भारत माता की जय… च्या जयघोषात शनिवारवाडयासमोर मानवी मनोरे करुन गणेशोत्सव व दहीहंडी मंडळांतील कार्यकर्त्यांनी भारतमातेला आगळीवेगळी मानवंदना दिली.

जय गणेश व्यासपीठाततर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त गणेशोत्सव कार्यकर्ता एकता रॅलीचे आयोजन महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा ते शनिवारवाडा असे करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठाचे महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, योगेश समेळ, विश्वास भोर, शाहीर हेमंतराजे मावळे, सुरेश पवार आदी उपस्थित होते. शनिवारवाडा प्रांगणात युवा वाद्य पथकातील वादकांनी ढोल-ताशा वादन केले. भोईराज दहीहंडी संघ, कसबा पेठ च्या कार्यकर्त्यांनी संदेश खडके, संजय तारु यांच्या नेतृत्वाखाली मानवी मनोरे करीत मानवंदना दिली.

मंडईतील टिळक पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन रॅलीला प्रारंभ झाला. शनिपार चौक, नगरकर तालीम चौक, अप्पा बळवंत चौक मार्गे शनिवारवाडा येथे रॅलीचा समारोप झाला. रॅलीमध्ये भारताच्या स्वातंत्र्यलढयात महत्वाचे योगदान देणा-या तात्या टोपे यांच्यापासून ते चापेकर बंधूंपर्यंत सर्व क्रांतिवीरांची छायाचित्रे असलेले फलक कार्यकर्त्यांनी हातात घेतले होते. तसेच भारतमातेच्या वेशात एका चिमुकलीने देखील सहभाग घेतला. शनिवारवाडा येथे रॅलीचे आगमन झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात मानवी मनोरे करीत हातात तिरंगा ध्वज घेऊन कार्यकर्त्यांनी मानवंदना दिली.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading