महाराष्ट्र रिक्षा पंचायत तर्फे सीएनजी दरवाढ विरोधात चक्काजाम आंदोलन
पुणे : तीन महिन्यांपूर्वी सीएनजी चा दर हा 62 रुपये होता तीन महिन्यांमध्ये अंदाजे 50 टक्के हा दर वाढून आजच्या तारखेस प्रति किलो 91 रुपये असा झालेला आहे. या विरोधात महाराष्ट्र रिक्षा पंचायत संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब कांबळे यांचे नेतृत्वाखाली 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11 वाजता आरटीओ समोरील महाराष्ट्र नॅचरल गॅस प्रायव्हेट लिमिटेड पेट्रोल पंपावर चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र रिक्षा पंचायतीचे पुणे शहराध्यक्ष शफिक भाई पटेल यांनी दिली आहे.
सीएनजी म्हणजेच कॉम्प्रेसङ नॅचरल गॅस याचे उत्पादन भारतामध्ये होते व त्यासाठी लागणारा कच्चामाल व इतर वस्तू हे सुद्धा भारतातच तयार होते. त्यामुळे हा दर आखाती देशातून निर्यात होणाऱ्या पेट्रोल व डिझेल या इंधनाची स्पर्धा करीत 91 रुपये प्रति किलोग्राम एवढा वाढलेला असून लवकरच शंभरी सुद्धा पार करेल तेसुद्धा राज्य सरकारने यावरील टॅक्स कमी केलेला असताना सुद्धा गॅसचे दर गगनाला भिडत आहे याचे आश्चर्य वाटते. हाच सीएनजी गॅस भारत बाहेरील देशांना सुद्धा निर्यात करतो. तरीसुद्धा बाहेरील कित्येक देशात याची किंमत साठ रुपये प्रति किलोग्रामच्या आसपास आहे. केंद्र सरकार तर्फे पेट्रोल व डिझेल वरील वाहनांऐवजी सीएनजी व इलेक्ट्रॉनिक वाहनांवर भर दिला जात आहे. आजच्या तारखेस रिक्षा, कार, टेम्पो, पीएमटी बसेस अशी सर्व व्यवसायिक वाहने ही सीएनजीवर चालणारी आहेत. यामुळे या व्यावसायिकांवर सीएनजी दरवाढीमुळे प्रचंड आर्थिक बोजा पडत आहे, यासाठी सीएनजीच्या दरावर सरकारने नियंत्रण आणावे अशी भूमिका पुणे शहराध्यक्ष शफिक पटेल यांनी मांडली आहे.