भरतनाट्यम आणि कथकमधून सादर झाला उत्कट भावनांचा अविष्कार
पुणे : लयबध्दरित्या होणारी शरीराची हालचाल, अतिशय नजाकतीने केलेल्या भावमुद्रा, चपळाईने केलेला पदन्यास असा नृत्याचा अतिशय सुंदर कलाविष्कार सादर झाला. बंगळुरु येथील नृत्यकलाकार डाॅ. शेषाद्री अय्यंगार आणि पुण्यातील कथक नृत्यांगना ईशा नानल यांनी भरतनाट्यम आणि कथक नृत्यशैलीमधून भक्ती, मातृप्रेम, विरह या मानवी भावना उत्कटपणे सादर केल्या. भारताच्या सांस्कृतिक विविधतेतील समृद्ध परंपरा त्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडली.
परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पुणे विभाग आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या वतीने विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नृत्यांगना सुचिता भिडे – चापेकर, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टचे संचालक प्रा. शारंगधर साठे तसेच भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन, पं. सुहास व्यास, महाविद्यालयाच्या नृत्य विभाग प्रमुख डाॅ. देविका बोरठाकूर उपस्थित होते. अबासिन सफी, नजीब रासा, अस्लम निक्झाई, वारीस हेमत, अब्दुल सामी रासा निअझाई, बिलाल निअझाई, बहिर गुल बहिर यांनी अफगाणी पारंपारिक नृत्याचे सादरीकरण केले.
डॉ. शेषाद्री अय्यंगार यांनी कार्यक्रमाच्या सुरुवातीला गणेश स्तुती सादर केली. यामध्ये त्यांनी विविध तालबद्ध कलाकृती सादर केल्या. त्यानंतरच्या वर्णम या प्रस्तुतीमध्ये त्यांनी प्रियकराची वाट पाहणारी प्रेयसी आणि तिची मैत्रीण यांच्यातील संवाद नृत्यातून सादर केला. यामध्ये ती स्वतः आणि तिचा प्रिय शिव भगवान यांच्यातील प्रेमाची आठवण करून दिली. तिसऱ्या सादरीकरणातून त्यांनी कन्नड कलाकृती रसिकांसमोर आणली. यामध्ये यशोदेचे कृष्णाबद्दलचे प्रेम अतिशय सुंदरपणे सादर केले. संत कवी भानुदास यांचा वृंदावै वेणू हा एक दमदार अभंग सादर करून उपस्थितांची मने त्यांनी जिंकली.
ईशा नानल यांनी सादरीकरणाच्या सुरुवातीला गुरुवंदना सादर केली. नंतर ताल चौतालात तोडे, त्रिताल आणि आमद ही तालप्रस्तुती केली. अत्यंत लयबध्द सादरीकरणामधून तिने रसिकांना सुंदर कलाकृतीची अनुभूती दिली. अभिनय प्रस्तुतीतून आजच्या एकलव्याची कथा तिने आपल्या नृत्याच्या माध्यमातून अतिशय प्रभावीपणे सांगितली.
