fbpx

चिखलवाडी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ करा : सुनील माने

पुणे : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगात पहिल्यांदा चिखलवाडी येथे साजरी करण्यात आली. यामुळे हे स्थळ ऐतिहासीक दृष्ट्या विकसित करणे गरजेचे आहे. येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ शासनाच्या विशेष योजनेतून करावे असे निवेदन भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांना दिले.
मागासवर्गीय समाजाच्या विविध समस्या सोडवण्यासाठी राज्याच्या समाजकल्याण विभागाने पुढाकार घ्यावा या मागणीसाठी सुनील माने यांनी समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे यांची भेट घेतली. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव समिती, चिखलवाडीचे अध्यक्ष स्वप्नील कांबळे, उपाध्यक्ष प्रतीक वाघमारे, जितेंद्र गायकवाड, अनिल माने आदी उपस्थित होते.
माने यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पहिल्यांदा १४ एप्रिल १९२८ साली जगात पहिल्यांदा पुणे शहरातील चिखलवाडी येथे साजरी केली होती. या अर्थाने हे ऐतिहासिक स्थळ असल्याने चिखलवाडी तसेच आसपासच्या परिसराचा पायाभूत सुविधा,शैक्षणिक विकास, रस्ते व आरोग्य विकास करणे आवश्यक आहे. यासाठी विशेष कृती आराखडा केला पाहिजे, याबाबत नियोजन करताना शासन आणि पुणे महानगरपालिका यांच्या समन्वयातून करण्याची आवश्यकता आहे. यासाठी सामाजिक न्याय विभाग व पुणे महानगरपालिका यांची संयुक्त बैठक आयोजित करावी. याबरोबरच स्पर्धा परिक्षेसाठी अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचा आधारवड समजल्या जाणाऱ्या ‘बार्टी’ संस्थेला अधिक सक्षम करावे, बार्टीला निधी वाढवून द्यावा, तसेच या संस्थेला अधिक प्रभावीपणे कार्य करण्यासाठी येथे कार्यक्षम आणि सक्षम अधिकारी नेमावे अशी मागणी केली.
शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बार्टी मार्फत शिष्यवृत्ती दिली जाते, मात्र सध्याची शिष्यवृत्ती संख्या अपुरी असल्याने,हा निधी वाढवून दिल्यास विद्यार्थ्यांच्या परदेशी शिक्षणासाठी मदत होऊन अधिक अधिकाधिक विद्यार्थांना याचा लाभ होईल असे ही माने यांनी समाजकल्याण विभागाकडे विनंती केली आहे.
याबाबत समाजकल्याण आयुक्त यांनी सकारात्मकता दाखवत चिखलवातील आंबेडकर स्मृतिस्थळासाठी निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.

Leave a Reply

%d bloggers like this: