निर्मलाताई पुरंदरे समाज परिवर्तनाचा प्रेरणास्रोत
विद्यार्थी साहाय्यक समितीच्या माजी कार्यकारी विश्वस्त, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या निर्मलाताई पुरंदरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त समितीच्या आपटे वसतिगृहातील कार्यकर्ता कक्षाला त्यांचे नाव देण्यात आले. यावेळी उपस्थित समिती कार्यकर्ते, आप्तेष्ट व मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांच्या कन्या माधुरी, पुत्र अमृत पुरंदरे, यांच्यासह कुटुंबीय, वनस्थळी संस्थेच्या सचिव भारती भिडे, कोषाध्यक्ष सुषमा साठे, संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, कार्यकारी विश्वस्त तुकाराम गायकवाड, विश्वस्त संजय अमृते, तुषार रंजनकर, रत्नाकर मते, कार्यकर्ते, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी निर्मलाताईंच्या कार्याविषयीची चित्रफित दाखविण्यात आली.
समिती हे आईचे पहिले प्रेम होते. तिला सामाजिक कार्याची ओढ होती. ती ओढ आम्हालाही खूप काही शिकवणारी होती. त्यातूनच नकळत आमच्यावर सामाजिक कार्याचे संस्कार झाले. समाजपरिवर्तनाचे तिने जे काम केले ते अगदी सहजरीत्या होते. ते तिच्या रक्तातच होते, अशा भावना अमृत पुरंदरे यांनी व्यक्त केल्या. यावेळी प्रतापराव पवार, डॉ. दीपक शिकारपूर, सुषमा साठे आदींनी निर्मलाताईंबरोबर काम करतानाच्या आठवणी सांगितल्या.
