Saturday, October 24, 2026
Latest NewsPUNE

‘हर घर तिरंगा’उपक्रमात सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर द्यावा- पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र संचालक किरण सोनी गुप्ता

पुणे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या ‘हर घर तिरंगा’ उपक्रमाबाबत पुणे जिल्ह्याचे नियोजन चांगले झाले असून या उपक्रमादरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास येथील कला, संस्कृतीला अधिक उजाळा मिळेल, असे मत केंद्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाअंतर्गत पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांनी केले.

‘हर घर तिरंगा’उपक्रमाच्या आयोजनाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सचिन घाडगे यांच्यासह विविध कार्यान्वयन यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पुणे, पिंपरी चिंचवड महानगर पालिकेची चांगली नाट्यगृहे, सांस्कृतिक सभागृहे असून याठिकाणी तसेच नगरपरिषद पातळीवरही स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.

यावेळी आयुष प्रसाद यांनी सादरीकरणाद्वारे या उपक्रमाबाबत जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. जिल्ह्यात २१ लाख ६० हजार कुटुंबे असून या प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कापड उद्योग, व्यवसाय असून त्या माध्यमातून ध्वजाची उपलब्धता करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. माफक दरात ध्वज उपलब्ध करुन देण्यात येणार असून काही दानशूर संस्था, सहकारी साखर कारखाने आदींकडून गरजूंना ध्वज मोफत उपलब्ध करुन देण्याचे नियोजन आहे. आठवडे बाजारातही ध्वज विक्री केंद्रे लावण्यात येणार आहेत.

उपक्रम राबवण्यासाठी प्रत्येक तहसीलदार आणि गटविकास अधिकारी कार्यालय स्तरावर नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ऐतिहासिक किल्ले, क्रांतीकारक, स्वातंत्र्यसेनानींची स्मारके यांची दुरुस्ती, सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून सुमारे १ हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे नियोजन आहे. स्वातंत्र्य रॅली, शाळा महाविद्यालयांमधून निबंध, वकृत्व, क्रीडा स्पर्धा आदींचे आयोजन करण्यात येणार आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावर युवा महोत्सव, स्थानिक कला, लोककलांना ठळकपणे दर्शवणारे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात व्हावेत. त्यासाठी पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्यावतीने आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल, असे श्रीमती सोनी गुप्ता म्हणाल्या.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading