Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

निवेदिता सराफ, स्वानंद पुंड महाराज यांना मंडई म्हसोबा ट्रस्टचे भूषण पुरस्कार

पुणे : अखिल म्हसोबा उत्सव मंडई ट्रस्टतर्फे यंदा दिनांक २५ ते २९ जुलै दरम्यान म्हसोबा उत्सवाचे आयोजन मंडईतील बुरूड आळी येथे करण्यात आले आहे. त्यामध्ये यंदाचे भूषण पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री निवेदिता सराफ, प. पू. स्वानंद पुंड महाराज यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांना प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे विश्वस्त उपाध्यक्ष निवृत्ती जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला विश्वस्त अध्यक्ष राहुल सूर्यवंशी, सारिका निंबाळकर, सुवर्णा खैरे, दिनेश पिसाळ आदी उपस्थित होते.

निवृत्ती जाधव म्हणाले, यंदाचा व्यापार भूषण पुरस्कार काका हलवाईचे संचालक युवराज गाडवे, उद्योग भूषण पुरस्कार बी. जे. भंडारी प्रा. ली.चे चेअरमन विजय भंडारी, कला भूषण पुरस्कार अभिनेत्री निवेदिता सराफ, संगीत भूषण पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार पं. कल्याण गायकवाड, धार्मिक भूषण पुरस्कार विद्यावाचस्पती स्वानंद पुंड महाराज आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सुनील माळी यांना प्रदान करण्यात येणार आहे.

सन्मानपत्र,सन्मानचिन्ह,फळांची करंडी, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट चे विश्वस्त अक्षय गोडसे, महाराष्ट्र पोलीस महेंद्र कडू यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.

स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे शुक्रवार, दिनांक २९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता होणा-या कार्यक्रमाला पद्मविभूषण डॉ. विजय भटकर, एअरमार्शल (निवृत्त) भूषण गोखले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच संपूर्ण उत्सवात पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, कोहिनूर उद्योग समूहाचे चेअरमन कृष्णकुमार गोयल, सुहाना मसालेचे संचालक विशाल चोरडिया, रांका ज्वेलर्स कर्वे रस्ताचे संचालक ओमप्रकाश रांका हे मान्यवर उपस्थित राहतील. वेंकीज उद्योग समूहाचे संचालक बालाजी राव आणि माणिकचंद उद्योग समूहाचे चेअरमन प्रकाश धारीवाल यांचे उत्सवाला विशेष मार्गदर्शन मिळाले आहे.

मंडई बुरूड आळीतील मुख्य मंदिरासमोरील उत्सवाची सुरुवात सोमवार, दिनांक २५ जुलै रोजी दुपारी १२ वाजता शालनअक्का भिंताडे, स्मिता भिंताडे, भिंताडे उद्योग समूह यांच्या हस्ते महाआरतीने होणार आहे. यावेळी आकर्षक पुष्पसजावट करण्यात येणार आहे. याशिवाय रुद्राभिषेक, रुद्रयाग, भजनसेवा, ढोल-ताशा पथक वादन असे दैनंदिन कार्यक्रम होतील. मंगळवार, दिनांक २६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता गरजू विद्यार्थ्यांना फुलस्केप वह्या वाटप होणार आहे. यावेळी ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. अ.ल. देशमुख, पुण्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आदी उपस्थित राहणार आहेत.

विश्रामबाग पोलीस स्टेशन विभागास बॅरिगेट्स देण्याचा कार्यक्रम बुधवार, दिनांक २७ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता होणार आहे. यावेळी ब्रिगेडियर सुनील लिमये (निवृत्त), परिमंडळ १ च्या पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, टायगर ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष तानाजी जाधव उपस्थित राहणार आहेत. गुरुवार, दिनांक २८ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यावेळी प. पू. कालीचरण महाराज यांची प्रमुख उपस्थिती असून त्यांची पाद्यपूजा होणार आहे. महाराजांच्या हस्ते आरती देखील होणार आहे. दिनांक २९ जुलै रोजी महाप्रसादाने उत्सवाची सांगता होईल. उत्सवातील सर्व कार्यक्रमांमध्ये पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading