fbpx

अनुवांशिक सिकल सेल ॲनिमियाचे परिणाम गंभीर – डॉ. सुदाम काटे

पुणे : “महाराष्ट्रात विशेषतः आदिवासींमध्ये २२.५ टक्के लोकांमध्ये सिकल सेल ॲनिमिया दिसून येतो. हा अनुवांशिक रोग आहे. याचे परिणाम गंभीर आहेत. सायप्रसमध्ये लोकांच्या प्रबोधनामुळे सिकल सेल नियंत्रणात आला. सामाजिक इच्छाशक्ती असेल भारतातही तसे करता येईल,” असे प्रतिपादन बीजे वैद्यकीय महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. सुदाम काटे यांनी केले.
मराठी विज्ञान परिषद पुणे विभागाच्या वतीने ‘सिकल सेल (कोयताकार पेशी) आणि त्यांचे आरोग्यावर होणारे परिणाम’ विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ. सुदाम काटे बोलत होते. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या व्याख्यानावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रा. राजेंद्रकुमार सराफ, प्रा. विनय र. र., संजीव अत्रे, डॉ. भोंडवे, अशोक सागर आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. सुदाम काटे म्हणाले, “मानवी रक्तात गोलाकार लाल रक्तपेशी शरीरभर ऑक्सिजन पुरवतात. काही स्त्री पुरूषांमध्ये त्यात चंद्रकोरी किंवा कोयत्याच्या आकाराच्या असतात. त्यातून कमी ऑक्सिजन वाहून नेला जातो. त्यामुळे रुग्णाच्या शरीरातील मेंदू, डोळा, हृदय, गर्भाशय अशा अवयवांच्या कार्यात बिघाड होतो. त्यामुळे रक्ताची तपासणी आवश्यक असते. सिकल सेलवर त्रास कमी करणारे औषोधोपचार आहेत. पण ते खर्चिक आहेत. सातपुडा पर्वतातील धुळे, नंदुरबार, जळगाव या जिल्ह्यांमधील आदिवासी पट्ट्यामध्ये चार हजाराहून अधिक सिकल सेल बाधीतांवर उपचार केले आहेत.”
प्रा. विनय र. र. म्हणाले, “बेल, मका, सरपुंखा, कोरफड इ. वनस्पती वापरून प्रभावी आणि स्वस्त औषधे डॉ. काटे यांनी बनवली आहेत. सिकल सेलमुळे हिवताप होण्याचा धोका कमी होतो. माणसाने शेतीचा शोध लावल्यानंतर डासांचा प्रादुर्भाव वाढला. त्यातून सुटकेसाठी सिकल सेल बनले असावेत, असे शास्त्रज्ञ म्हणतात. विवाह जुळवताना वधूवरांची रक्त चाचणी करून पुढील निर्णय घेतला तर पुढच्या पिढ्या अनुवांशिक रोगांपासून मुक्त करता येतील. सिकल सेल तपासणीसाठी अन्यत्र बाराशे रुपये लागतात. ही चाचणी डॉ. काटे केवळ आठ रुपयात करून देतात.”
सिकल सेलचे आरोग्यावर काय परिणाम होतात? हा आजार अनुवंशिक आहे का? अन्य कोणत्या कारणांनी होऊ शकतो का? सिकल सेल बाधीत व्यक्ती कशी ओळखावी? या बाधेवर काही उपाययोजना आहेत का? अशा व्यक्तींनी लग्न – संसार करावा का? आदी प्रश्नांची उत्तरे आणि अधिक माहिती डॉ. काटे यांनी दिली. माजी प्राचार्य असलेल्या डॉ. काटे यांनी गेली ५० वर्षे सिकल सेल क्षेत्रात काम केले आहे. ८९ वर्षांचे काटे अजूनही कार्यरत आहेत.
अंजली साठे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. राजेंद्रकुमार सराफ यांनी आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: