fbpx

गुरुदेव दत्तनामाच्या जयघोषात लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात १२५ वा गुरुपौर्णिमा उत्सव साजरा

पुणे : गुरुदेव दत्त… दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा… च्या जयघोषाने बुधवार पेठेतील कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिराच्या परिसर दुमदुमून गेला. दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (१२५) गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने मंदिरात व मंदिर परिसरात आकर्षक फुलांची आरास व नयनरम्य विद्युतरोषणाई करण्यात आली होती. सकाळपासून पावसाची संततधार सुरु असली तरी देखील भाविकांनी दर्शनाकरिता मोठया प्रमाणात मंदिरात गर्दी केली.

गुरुपौर्णिमेची माध्यान्ह आरती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता व कुटुंबियांच्या हस्ते झाली. यावेळी माजी खासदार अशोक मोहोळ, बाळासाहेब गांजवे, शिरीष मोहिते, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड.प्रताप परदेशी, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड.शिवराज कदम जहागिरदार,उत्सव उपप्रमुख युवराज गाडवे, विश्वस्त सुनिल रुकारी, राजू बलकवडे, अक्षय हलवाई आदी उपस्थित होते. संपूर्ण मंदिरावर देखील आकर्षक पुष्परचना करण्यात आली होती. तसेच मंदिरात गुरुचरणांवर पुष्पांजली अर्पण करतानाचा फुलांचा देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.

बुधवारी पहाटे ५.३० वाजता हलवाई कुटुंबियांच्या हस्ते लघुरुद्र झाला. त्यानंतर पुणे मनपा माजी सभागृह नेते श्रीनाथ व वंदना भिमाले यांच्या हस्ते श्री दत्तयाग संपन्न झाला. तर, सकाळी ८ वाजता जिल्हा तथा सत्र न्यायाधिश संजय भारुका व त्यांच्या पत्नी उमा भारुका यांच्या हस्ते प्रात:आरती पार पडली. तसेच, सायं आरती सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस आयुक्त (प्रशासन) डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते झाली. संपूर्ण दिवसभर मंदिरासमोरील श्री दत्त कला मंच उत्सव मंडपात भाविकांनी स्वहस्ते अभिषेकाचा देखील लाभ घेतला.

गुरुपौर्णिमेनिमित्त बेलबाग चौकापासून मंदिरापर्यंत दुतर्फा श्री दत्त महाराजांचे चार अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ, नृसिंह सरस्वती, माणिकप्रभू, अक्कलकोट स्वामी समर्थ व संत परंपरेतील श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी, माधवनाथ महाराज, गजानन महाराज, साईबाबा, शंकरमहाराज, गोंदवलेकर महाराज, नाना महाराज तराणेकर तसेच श्री महादेवांसह श्री दत्त महाराज व क्रमाने सर्व नवनाथांच्या लावलेल्या आकर्षक तसबिरी हे खास वैशिष्टय होते.

Leave a Reply

%d bloggers like this: