CSK Ice Squash Trophy – महाराष्ट्राच्या सुरज चंद, तनिष्का जैन यांना विजेतेपद !
‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२२ खुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धा
पुणे आयस्क्वॉश अॅकॅडमी तर्फे आयोजित ‘सीएसके आयस्क्वॉश करंडक’ २०२२ खुल्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेत पुरूष गटामध्ये महाराष्ट्राच्या सुरज चंद आणि महिला गटात महाराष्ट्राच्या तनिष्का जैन यांनी विजेतेपद संपादन केले.
मुंढवा येथील चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या १९ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या आणि अग्रमानांकित ओम सेमवाल याने त्याचाच राज्यसहकारी अर्णव सरीन याचा ११-३, ११-३, ११-९ असा पराभव करून या मुलांच्या गटाचे विजेतेपद संपादन केले.
पुरूष गटामध्ये महाराष्ट्राच्या आणि व्दितीय मानांकित सुरज चंद याने सर्व्हिसेसच्या आणि अग्रमानांकित साकिब जमाल याचा ११-३, ५-११, ११-२, ११-२ असा सनसनाटी पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. साकिब याला अग्रमानांकन असल्याने सुरवातीपासूनच त्याचे पारडे जड असल्याचे मानले जात होते. पण अंतिम सामना सुरू झाल्यानंतर सुरज याने अचूक आणि जलद खेळ केला. पहिला सेट ११-७ असा जिंकून सुरजने जोरदार सुरूवात केली. साकिब याने दुसरा सेट ११-९ असा निसटता जिंकत आपण सहजासहजी हार मानणार नाही, हे दाखवून दिले. सुरज याने आपला खेळ उंचावत ११-२, ११-२ असे पुढील सेट जिंकून साकिबला सामन्यात परत येण्याची संधी दिली नाही आणि विजेतेपदाला गवसणी घातली.
महिला गटामध्ये महाराष्ट्राच्या तनिष्का जैन हिने दिल्लीच्या आणि पाचव्या मानांकित जनेत विधी हिचा ११-७, ९-११, ११-२, १२-१० असा पराभव करून विजेतेपद मिळवले.
३५ वर्षावरील पुरूष गटात सर्व्हिसेसच्या आशिष केसकर, ४५ वर्षावरील पुरूष गटात महाराष्ट्राच्या हेमंत नाडकर्णी, ५५ वर्षावरील पुरूष गटात महाराष्ट्राच्या अन्शु बही आणि प्रोफेशनल कोच पुरूष गटात महाराष्ट्राच्या संजय पवार यांनी विजेतेपद मिळवले.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण चंचला संदीप कोद्रे (सीएसके) स्पोर्ट्सचे संचालक संदीपदादा कोद्रे, योध्दा प्रिमिअर पे रेंटल केअर सर्व्हिसेसचे संचालक तरूण शर्मा, एचटूओ हेअर स्कीन अँड नेल अॅकॅटमीच्या संचालिका करिष्मा राजपुत, टर्नअराऊंड इंटरनॅशनल सर्व्हिसेसचे अरविंद वैंकट, आयस्क्वॉश अॅकॅडमीचे संचालक असिफ सय्यद आणि मनिषा जिल्का यांच्या हस्ते करण्यात आले.
स्पर्धेच्या अंतिम फेरीचे निकालः १९ वर्षाखालील मुलांचा गटः
ओम सेमवाल (महा, १) वि.वि. अर्णव सरीन (महा) ११-३, ११-३, ११-९;
पुरूष गटः सुरज चंद (महा, २) वि.वि. जमाल साकिब (सर्व्हिसेस, १) ११-३, ५-११, ११-२, ११-२;
महिला गटः तनिष्का जैन (महा, ९) वि.वि. जनेत विधी (दिल्ली, ५) ११-७, ९-११, ११-२, १२-१०;
३५ वर्षावरील पुरूष गटः
आशिष केसकर (सर्व्हिसेस) वि.वि. पॉल ए. (तामिळनाडू, १) ११-८, ९-११, १४-१६, ११-९, ११-२;
४५ वर्षावरील पुरूष गटः
हेमंत नाडकर्णी (महा) वि.वि. अनिल भगत (दिल्ली) ११-९, ५-११, ६-११, ११-८, १२-१०;
५५ वर्षावरील पुरूष गटः
अन्शु बही (महा, १) वि.वि. इंद्रजीत सिंग (उत्तरप्रदेश) १२-१०, १२-१०, १२-१०;
प्रोफेशनल कोच पुरूष गटः
संजय पवार (महा, १) वि.वि. सुरज भट्ट (मध्यप्रदेश) ११-७, ४-११, ११-७, ११-५;
