Sunday, September 6, 2026
Latest NewsPUNE

स्वर-सूरांच्या मैफिलीत पुणेकर मंत्रमुग्ध

पुणे : राजस आणि तेजस या उपाध्ये बंधूनी सादर केलेली व्हायोलिन जुगलबंदी, गायक राहुल देशपांडे यांचे बहारदार गायन आणि उत्तरोत्तर रंगत गेलेला पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचा ‘ऑर्केस्ट्रा ऑफ व्हायोलिन ‘ ने रसिकांची मने जिंकली. या अनोख्या सांगीतिक कार्यक्रमाद्वारे पुणेकरांनी एक रम्य संध्याकाळ अनुभवली.

व्हायोलिन अकॅडमी आणि ऑर्लीकॉन बाल्झर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सातव्या ‘स्वरमल्हार’ महोत्सवाचा रविवारी, दिनांक ३ जुलै रोजी समारोप झाला.

याप्रसंगी उस्ताद फैय्याज हुसैन खान यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच व्हायोलिन अकॅडमी’ चे पंडित अतुलकुमार उपाध्ये, बडेकर ग्रुप’ चे प्रवीण बडेकर, चंदूकाका सराफ अँड सनस ‘चे सिद्धार्थ शहा आणि अंकिता शहा, फिनोलेक्स केबल प्रायव्हेट लिमिटेड चे पुष्कर भिडसगावकर हे याप्रसंगी उपस्थित होते.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची सुरवात व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांचे पुत्र तेजस आणि राजस यांच्या व्हायोलिन जुगलबंदीने झाली. त्यांनी राग किरवणीतील आलापाद्वरे सादरीकरणास सुरवात केली. त्यानंतर जोडझाला, विलंबित झपताल आणि तीन तालातील रचना सादर केल्या. त्यांना ईशान घोष यांनी तबल्यासाठी साथ केली.

त्यानंतर गायक राहुल देशपांडे यांचे गायन झाले. त्यांनी राग मियामल्हाराने आपल्या गायनाची सुरवात केली. त्यानंतर केदार आणि गंधर्व रागातील ‘चुनरिया ‘ ही मिश्र रचना सादर केली. दादरा ‘ बिंदिया ले गयी हमारी रे मछरिया ‘ सादर करत त्यांनी आपल्या गायनाचा समारोप केला. त्यांना डॉ चैतन्य कुंटे (संवादिनी), अजिंक्य जोशी (तबला), ऋषीकेश पाटील आणि निमिष उत्पात (तानपुरा आणि स्वर साथ) यांनी साथ सांगत केली.

महोत्सवाचा समारोप ‘ऑर्केस्ट्रा ऑफ व्हायोलिन ‘ ने झाला. यावेळी ‘खमाज के रंग’ ही स्वरचित मिश्र रागातील रचना सादर करण्यात आली.  बासरीवादक अमर ओक आणि इटावा घराण्याच्या आठव्या पिढीचे प्रतिनिधी सतारवादक शाकीर खान यांनी यावेळी साथसंगत केली.  संपूर्ण महोत्सवाचे सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading