माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील शिवसेनेतच; आधी हकालपट्टी नंतर सारवासारव
पुणे : शिवसेनेचे शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यावर पक्षाविरोधात कारवाई केल्याचा ठपका ठेवत त्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्याची बातमी आज ‘सामना’ आली. पण काही तासातच शिवाजीराव आढळराव यांची हकालपट्टी करण्यात आली नसल्याचे, शिवसेनेकडून जाहीर करण्यात आले.
महाविकास आघाडी झाल्यापासून शिवाजी आढळराव पाटील हे नाराज होते. अनेकवेळा त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली होती. दरम्यान, काल शिवाजी आढळराव पाटील यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री व शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांना सोशल मीडिया वरून सुभेच्छा दिल्या होत्या. त्यामुळे शिवाजी आढळराव पाटील हे सुद्धा शिंदे गटात जाणार की काय अशी चर्चा रंगू लागली होती. त्यातच आज ‘सामना’मधू शिवाजी आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी केल्याची बातमी आली. मात्र काही तासांनी ही बातमी चुकीने छापण्यात आल्याचे सांगत ते शिवसेनेतच असल्याचे सांगण्यात आले.
पुणे जिल्ह्यात शिवसेना वाढवण्यात शिवाजी आढळराव पाटील यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी 2004 मध्ये शिरुर लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर विजय मिळवला होता. त्यानंतर 2009 आणि 2014 लोकसभा निवडणुकीत देखील विजय मिळवला होता. मात्र 2019 मध्ये राष्ट्रवादीच्या डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडून त्यांना पराभवाचा स्वीकारावा लागला होता. लोकसभेत पराभव झाल्यानंतर त्यांना शिवसेनेकडून उपनेते पद देण्यात आले होते.
