शंभराव्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चंद्रराव इंगळे या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याचा सन्मान
पुणे: आपले संपूर्ण आयुष्य पोलीस सेवेत अर्पण करणाऱ्या चंद्रराव पंढरीनाथ इंगळे यांचे वयाच्या शंभराव्या वर्षात पदार्पण होत असल्याच्या निमित्ताने पुण्यात सन्मान करण्यात आला. स्टेट सीआयडी क्राईम महाराष्ट्राचे डायरेक्टर या पदावरून ते निवृत्त झाले असून निष्ठेने पोलीस खात्यात त्यांनी आपली कामगिरी बजावली आहे.
आम्ही पुणेकर आणि शारदा ज्ञानपीठम् यांच्या वतीने चंद्रराव इंगळे यांच्या सहकारनगर येथील निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी पंडित वसंत गाडगीळ, माजी आमदार उल्हास पवार, आम्ही पुणेकर संस्थेचे हेमंत जाधव, डॉ. अशोककुमार इंगळे, अखिल झांजले, दुर्गेश बामणे, समीर देसाई, संतोष फुटक आदी उपस्थित होते. पुणेरी पगडी, शाल, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरूप होते. भारत सरकारच्या डाक विभागातर्फे माय स्टॅम्प अंतर्गत विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन देखील करण्यात आले आहे.
पं. वसंतराव गाडगीळ म्हणाले, चंद्रराव इंगळे यांनी सन १९४६ ते १९८१ सालापर्यंत पोलीस सेवेत फिंगरप्रिंट एक्सपर्ट डायरेक्टर पर्यंतचा प्रवास त्यांनी निष्ठेने केला. डायरेक्टर या पदावरून निवृत्त झालेल्या या थोर पोलीस अधिकाऱ्याचा आदर्श पोलीस खात्याच्या इतिहासात अभूतपूर्व ठरणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
उल्हास पवार म्हणाले, मन आनंदित राहिले तर जीवन निरोगी आणि आनंदात जगता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे चंद्रावर इंगळे आहेत. योग्य जीवनशैलीचे पालन करून शंभराव्या वर्षी देखील ते निरोगी जीवन जगत आहेत. आजच्या काळातील प्रत्येकासाठी ते आदर्शच आहेत, असे ही त्यांनी सांगितले.
