….फडणवीसांचा चेहरा काही वेगळेच सांगत होता – शरद पवार
पुणे : कोणताही आदेश हा दिल्लीतून आल्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर पडली. याची कल्पना कोणालाच नव्हती. कदाचित शिंदेंना सुद्धा नसावी. शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मी मंत्री होतो. जेव्हा मी मुख्यमंत्री झालो, तेव्हा शंकरराव माझ्या मंत्रिमंडळात आले. अशोकराव चव्हाण देखील मुख्यमंत्री होते, त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे यामुळे फडणवीसांची स्वीकृती मला आश्चर्याची वाटली नाही, परंतू फडणवीसांचा चेहरा काही वेगळेच सांगत होता, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत नव्हता, आरएसएसच्या संस्कारांमुळे त्यांनी ते स्वीकारले, असा टोला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लगावला. कदाचित हे ठरवून केले गेले असेल, अशी शंकाही पवारांनी व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले की, आता जे मुख्यमंत्री झाले ते ठाण्याचे प्रतिनिधी आहेत, पण ते मूळचे साताऱ्याचे आहेत. राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे साताऱ्याचे माझंही मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याचा आहे. मी देखील राज्याचा मुख्यमंत्री झालो. बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.”
एकनाथ शिंदेंनी सेनेच्या आमदारांना प्रभावित केलं, जवळपास 40 आमदार बाहेर नेले, हेच त्यांचं मोठं यश आहे असं शरद पवार म्हणाले. आमदारांना बाहेर नेणं हे प्लॅनिंग आधीपासूनच होतं, ते काही एका दिवसात होणं शक्य नाही.
काँग्रेस राष्ट्रवादीमुळे सरकार गेलं असं सांगणं योग्य नाही, आता काहीतरी कारणं द्यावी लागतात म्हणून असं सांगितलं जातंय असं शरद पवार म्हणाले.
ईडी आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणेमुळे राज्यातील सत्ता बदलत आहेत. या एजन्सीचा उपयोग हा राजकीयदृष्ट्या वेगळ्या विचारांच्या लोकांविरोधात केला जातोय असं शरद पवार म्हणाले. आगामी निवडणुका या महाविकास आघाडी म्हणून एकत्रित लढायचं की नाही याचा विचार अद्याप झाला नसल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.
